Breaking News

भाजपाला रोखण्यासाठी काका-बाबा गट एकत्र; मलकापूर नगर पालिकेत काका गटाला 19 पैकी 5 जागी उमेदवारी देण्याचे निश्‍चित


कराड (प्रतिनिधी) : पश्‍चिम महाराष्ट्र राष्ट्रीय काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातील मलकापूर नगरपालिकेचा गड राखून भाजपला रोखण्यासाठी अखेर काका बाबा गटाचा समजता झाले असल्याची खात्री आहे. मलकापूर नगरपालिकेसाठी काका गटाला 19 पैकी 5 जागी उमेदवारी देण्याचे निश्‍चित झाले असेल आज संबंधितांचे राष्ट्रीय काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.

मलकापूर नगरपालिकेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच इच्छुकांच्या हालचाली अधिक गतिमान झाल्या आहेत. गतवेळच्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस आघाडीने 17 शून्य अशी कामगिरी करत नगरपंचायतीचे सत्ता काबीज केली होती. त्यावेळी असलेली परिस्थिती आणि सध्याची परिस्थिती यात अनेक बदल झाले आहेत यामुळे नुकत्याच झालेल्या मलकापूर नगरपालिकेसाठी होणारी निवडणूक अधिक रंजक बनणार आहे. मलकापूर नगर पालिकेच्या निवडणूक कडे केवळ सातारा जिल्ह्याचाच नव्हे तर सातारा सांगली कोल्हापूर ंपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. त्याला कारण ही तसेच आहे. मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत काही महिन्यातच लोकसभेची निवडणूक होणार आहे. यामुळे सत्तासंघर्षाची म्हणूनच मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीकडे पाहिले जात आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड दक्षिण मतदार संघातील महत्वपूर्ण शहर म्हणून मलकापूरचा उल्लेख केला जातो. मलकापूर हे कराडचे जुळे शहर असे म्हणून ही ओळखले जाते. राजकीय दृष्ट्या मलकापूर शहरात सध्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक मनोहर शिंदे यांच्यासह माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांचे पूर्वाश्रमीचे खंदे समर्थक अशोकराव थोरात तसेच भाजपचे प्रदेश सरचिटणीस युवानेते डॉ. अतुल बाबा भोसले यांचे गट या ठिकाणी कार्यरत आहेत. गतवेळी मलकापूर नगरपंचायतीची झालेली निवडणूक राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून मनोहर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. अतुल बाबा भोसले यांच्या गटाने एकत्रित लढली होती. त्यावेळी काँग्रेस आघाडीला माजी मंत्री उंडाळकर यांचे तत्कालीन समर्थक अशोकराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली लढत दिली होती. काँग्रेस आघाडीला आमदार बाळासाहेब पाटील यांच्या गटाने ही भक्कम साथ दिली होती. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस आघाडीने 17 0 अशी सत्ता संपादित केली होती.
या निवडणुकीत ही सर्व राजकीय समीकरणे बदलली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कराड दक्षिणेत काका-बाबा मनोमिलनाचे नवे वारे वाहू लागले आहे याचे मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत पहावयास मिळतील, अशी राजकीय गोटातून चर्चा होताना दिसत होती. विद्यमान सत्ताधारी काँग्रेस आघाडीचे नेतृत्व करणारे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्रीपदावर असताना मलकापूर शहरासाठी भरीव निधी उपलब्ध करून अनेक विविध विकास कामाची जुळणी केली होती. गेल्या चार वर्षात युवानेते डॉ. भोसले यांनी मलकापूर शहराच्या विकासासाठी ना. चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे आणून मलकापूर शहरात भाजपचे विचार रुजविण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत दरम्यान माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यापासून फारकत घेत दूर झालेले अशोकराव पाटील सध्या अतुल भोसले यांच्या नेतृत्व खाली मलकापूर निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. दरम्यान माजी मंत्री उंडाळकर यांच्या गटातील काही कार्यकर्त्यांनी मनोहर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आघाडीतून निवडणूक लढण्यासाठी तयारी सुरू केली असल्याची चर्चा होती. मात्र, उमेदवारी देण्याच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी काका-बाबा गटाची गट्टी फुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, बुधवारी गटाच्या पाच उमेदवारांचे राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत चिन्हावरून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे मलकापूर नगर पालिकेच्या निवडणुकीत काका-बाबा गटाच्या मनोमिलनची नांदी समजली जात आहे.
काँग्रेस आघाडीला आमदार बाळासाहेब पाटील गटाचे पुन्हा एकदा समर्थन मिळण्याची चिन्हे आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करता काका बाबा गटाचे मनोमिलन होऊन मलकापूर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस प्रणित मनोहर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी विरोधात युवा नेते डॉ भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणीत आघाडी अशी थेट आमने-सामने लढत होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या निवडणुकीला अधिक रंगत प्राप्त होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. प्रांतिक राजकारणाचा विचार करतात मलकापूर नगरपालिकेची निवडणूक काँग्रेस आघाडीविरोधात भाजप आघाडी अशी होणार आहे. या काँग्रेस भाजप सत्तासंघर्षाचे पडसाद आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या निकालावर दिसू शकतील, अशी शक्यता असल्याने सातारा जिल्ह्यासह संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्राचे मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले आहे.