Breaking News

भाजीपाला 20-25 टक्क्यांनी महागला; परराज्यातील भाजीपाल्याची आवक मंदावली


नवी मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट पसरली आहे. याचा परिणाम भाजीपाला उत्पादनावरही झाला आहे. उत्पादन घटल्यामुळे नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये येणारी भाज्यांची आवक घटली आहे. परिणामी भाज्यांचे दर 20 ते 25 टक्क्यांनी वधारले आहेत.

महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक राज्यातूनही दररोज 650 ते 700 गाड्या भरुन भाजीपाला एपीएमसीमध्ये दाखल होत असतो. मात्र आता यात 150 गाड्यांची घट झाली आहे. म्हणजेच भाज्यांची आवक 500 ते 550 गाड्यांवर आली आहे. गुजरातमधील आवक कमी झाली असून भाजीपाल्याच्या किंमती 20 ते 25 टक्क्यांनी वधारल्या आहे. फक्त वाटाणा आणि पालेभाज्यांच्या किंमती कमी झाल्या आहेत. शंभर रुपयांच्या वर असलेला वाटाणा सध्या 30 ते 40 रुपये किलो दराने विकला जात आहे. मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या परिसराला भाज्यांचा पुरवठा करणार्‍या पुणे आणि नाशिक जिल्ह्यातून आवक घटल्याने गेल्या काही दिवसांपासून भाज्यांचे दर वाढले आहेत. एरवी घाऊक बाजारात दहा रुपयांच्या आत विकला जाणार्‍या फ्लॉवर, कोबीचे दरही 20 ते 25 रुपयांच्या घरात पोहचले आहेत. किरकोळ बाजारात गवार 80 रुपयांवर तर काकडी 30 रुपयांवरून 50 रुपयांवर पोहोचली आहे. पाण्याची कमतरता आणि कडाक्याच्या थंडीमुळे आवक घटू लागल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. टोमॅटोचे उत्पादनही घटले असून घाऊक बाजारात 24 रुपयांनी मिळणारा टोमॅटो किरकोळ बाजारात मात्र 40 ते 50 रुपये किलोने विकला जात असल्याची माहिती कल्याण कृषी समितीचे अधिकारी यशवंत पाटील यांनी दिली. नाशिक येथून मुंबईत विक्रीसाठी येणारी कोथिंबीरची मोठी जुडीही घाऊक बाजारात 25 तर किरकोळीत 50 ते 55 रुपयांना विकली जात आहे. किरकोळ बाजारात गेल्या आठवडयात 20 रुपये किलोने मिळणारा कोबी सध्या किरकोळीत 40 रुपये किलोने विकला जात आहे.

थंडी व दुष्काळी परिस्थितीमुळे भाज्या महाग 


गेल्या काही वर्षांपासून वाशीतील कृषी उत्पन्न बाजारात बाराही महिने परराज्यातील भाजी येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून बागायती पट्टयावर दुष्काळाचे सावट असून याच भागात पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे भाज्यांची आवक कमी झाली आहे. दुष्काळामुळे भाज्यांना पुरेसे पाणी मिळत नाही. तसेच कडाक्याच्या थंडीमुळे फळभाज्यांची वाढ खुंटते. त्यामुळे काकडीचे उत्पन्न घटून 50 टक्क्यांवर आले आहे. गेल्या आठवडयात घाऊक बाजारात 25 रुपये किलोने मिळणारी सिमला मिरची सध्या 30 रुपये किलोने तर किरकोळीत 60 रुपये किलोने विकली जात आहे. घाऊक बाजारात एरव्ही 30 रुपये किलोने मिळणारी गवार सध्या 50 रुपयांनी विकली जात असल्याने किरकोळीतही गावरचे भाव वधारले आहेत.