Breaking News

इस्त्रो 2021 मध्ये अंतराळात मानव पाठविणार महिलेसह सात जणांना घेऊन गगगयान झेपावणार


चेन्नईः अनेक उपग्रह व चांद्रयानाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण करणार्‍या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) डिसेंबर 2021 पर्यंत भारतीय माणूस अंतराळात पाठवण्याचा संकल्प केला आहे. इस्रोचे प्रमुख के. सिवान यांनी आज ही माहिती दिली. डिसेंबर 2021मध्ये एका महिलेसह सात भारतीय अंतराळवीरांना घेऊन ’गगनयान’ अंतराळात झेपावेल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय, जून 2019 पर्यंत भारताचे ’चांद्रयान 2’ अंतराळात झेपावेल, असा विश्‍वासही इस्रोने व्यक्त केला.या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी दहा हजार कोटी रुपयांचा निधीही देण्यात आला आहे. 

चांद्रयान1 यशस्वी झाल्यानंतर जून 2019 पर्यंत चांद्रयान 2ही अंतराळात झेपावेल असा विश्‍वास इस्त्रोने व्यक्त केला आहे. भारत लवकरच अंतराळवीर अवकाशात पाठवेल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील स्वातंत्र्यदिनी केली होती. त्यानंतर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 10 हजार कोटी रुपयांचा निधीही देण्यात आला. ’इस्रो’चे प्रमुख के. सिवान यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. ’गगनयान’ प्रकल्प यशस्वी झाल्यास अंतराळात मानव पाठवणारा भारत चौथा देश ठरणार आहे. 
गगनयान 7 अंतराळवीरांना घेऊन अवकाशात भरारी घेण्याआधी दोन मानवविरहीत अंतराळयाने अवकाशात झेपावणार आहेत. पहिले यान डिसेंबर 2020मध्ये तर दुसरे जुलै 2021मध्ये अवकाशात झेपावण्याची शक्यता आहे. ’गगनयान’ मोहिमेसाठी अंतराळवीरांची निवड भारतीय हवाई दल आणि इस्त्रो संयुक्तपणे करणार आहेत. या अंतराळवीरांना प्राथमिक प्रशिक्षण भारतात देण्यात येईल, तर प्रगत प्रशिक्षणासाठी रशियाला पाठवण्यात येईल. अंतराळवीरांमध्ये एका महिलेचाही समावेश असेल. 

मानवी अंतराळयान पाठवण्यासाठी ज्या तंत्रज्ञानाची गरज आहे, ते विकसित करण्यात आले आहे. तसेच, या प्रकल्पासाठी रशियाचीही मदत घेतली जाणार आहे.