Breaking News

अयोध्या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर न्या. लळित सुनावणीपासून दूर; 29 तारखेला घटनापीठाचे गठण


नवीदिल्लीः संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी येत्या 29 जानेवारीपर्यंत टळली आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठातील एक न्यायाधीश न्या. उदय लळित यांनी सुनावणीदरम्यान स्वत:ला घटनापीठापासून अलग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता नव्या घटनापीठाचे गठण करावे लागणार आहे. घटनापीठात 5 न्यायाधीश असणे आवश्यक असल्याचे मत या वेळी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी व्यक्त केले. आता 29 जानेवारीला नव्या घटनापीठासमोर सुनावणीची तारीख निश्‍चित केली जाणार आहे. 

घटनापीठापुढे सुनावणी सुरू होत असताना मुस्लिम संघटनेचे वकील राजीव धवन यांनी न्या. लळित यांच्या घटनापीठातील उपस्थितीवर आक्षेप घेतला. न्या. लळित यांनी 1994 मध्ये राम मंदिर आंदोलनाशी संबंधीत एका प्रकरणात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांचे वकीलपत्र घेतले होते. तेव्हा त्यांनी घटनापीठातून वेगळे व्हावे, अशी विनंती धवन यांनी केली. तेव्हा न्या. लळित यांनी ते मान्य करत स्वत:ला वेगळे करण्याची विनंती सरन्यायाधीशांकडे केली. दरम्यान, न्या. लळित यांच्या घटनापीठातील उपस्थितीवर हरकरत नसल्याचे रामलल्लाच्या वतीने बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी म्हटले. ज्या प्रकरणासाठी न्या. लळित हे वकील म्हणून उभे राहिले होते, ते प्रकरण पूर्णपणे वेगळे असल्याचे साळवे यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला. 

यावर न्या. लळित यांनी घटनापीठातून बाजूला व्हावे, यासाठी आपण हा मुद्दा उपस्थित केला नसून केवळ माहितीसाठी तो उपस्थित केला, असे स्पष्टीकरण धवन यांनी दिले; मात्र न्या. लळित यांनी घटनापीठापासून अलग होण्याची इच्छा व्यक्त केली. न्या. लळित यांनी घटनापीठापासून अलग होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर, आता त्यांनी या प्रकरणावरील सुनावणीत भाग घेणे उचित होणार नाही, असे घटनापीठातील अन्य न्यायाधीशांचे मत असल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी स्पष्ट केले. या कारणामुळे सुनावणी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता अयोध्या प्रकरणावरील पुढील सुनावणीसाठी नव्या घटनापीठाचे गठन केले जाणार आहे. नव्या घटनापीठात न्या. लळित यांच्या जागी नव्या न्यायाधीशांचा समावेश केला जाणार आहे.