Breaking News

घाटाई फाट्यावर अपघात; 3 वन कर्मचारी जखमीपरळी,  (प्रतिनिधी) : कास पठारावरील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या पेट्रोलिंग वाहनाचा गुरुवारी दुपारी तीन वाजता कास पठारालगत असणार्‍या घाटाई फाट्यावर अपघात झाला. या अपघातामध्ये तीन वन कर्मचारी जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी जिल्ह्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, कास पठारावरील कासाणी, आटाळी, घाटाई तसेच कास पठार या परिसरात कुमुदिनी तलाव राजमार्ग या मार्गालगत वन्य प्राण्यांसाठी कृत्रिम पाणी साठे तयार करण्यात आले आहेत. 

या पाणी साठ्यामध्ये पाणी सोडण्याठी वनसमितीचे वाहन (एमएच 11 एबी 8552) कासणीहून कास रस्त्याकडे येत असताना समोरून आलेल्या दुसर्‍या एका वाहनाची (एमएच 11 बीएच 2233) समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये वन कर्मचारी गंगाराम काळे, विजय बादापुरे, संदीप साळुंखे हे जखमी झाले, तर दुसर्‍या वाहनातील जखमींचे नावे समजू शकले नाही. जखमींना अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी वन समितीचे अधिकारी, पदाधिकारी दाखल झाले. सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते