Breaking News

राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण 377 उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत; शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेत नियुक्तीचे आदेश काढण्याची केली मागणी


मुंबई : राज्यसेवा परीक्षा 2017 चा अंतिम निकाल 30 मे 2017 रोजी जाहीर झाला. या परीक्षेतून 377 उमेदवारांची निवड ही उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलीस उपअधीक्षक, सहायक विक्रीकर आयुक्त, मुख्याधिकारी अशा विविध 21 प्रकारच्या महत्वाच्या पदाकरीता करण्यात आली. 1 ऑगस्ट रोजी यशदा पुणे व वनामती नागपूर येथे सुरु होणारे प्रशिक्षण हे समांतर आरक्षण यावर पडलेल्या याचिकेमुळे पुढे ढकलण्यात आले आहे. आमदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तेव्हा आठवडाभरात प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन देण्यात आले.

राज्यसेवा परीक्षा 2017 ची मुख्य परीक्षा ही सप्टेंबर 2017 मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेचा अंतिम निकाल हा एप्रिल 2018 मध्ये अपेक्षित असताना उशीराने जाहीर झाला. या निकालातील 17 उमेदवारांची निवड ही उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथील याचिका अंतिम निर्णयाच्या अधीन राहून दिल्याचे समजते. यासंदर्भात उच्च न्यायालय मुंबई यांचे औरंगाबाद खंडपीठ येथे सामान्य प्रशासन विभागाने याचिकेचा अंतिम निकाल लागेपर्यंत कोणालाही नियुक्ती न देण्याची भुमिका घेतली आहे. या परिक्षेत खुला (महिला) संवर्गाकरीता 55 जागा व खुला (खेळाडू) संवर्गाकरीता 8 जागा वगळता इतर 314 जागांबाबत कोणत्याही प्रकारचा वाद नाही. तरीदेखिल सर्वच उमेदवारांची नियुक्ती रखडल्याने उत्तीर्ण उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात अन्यायाची भावना निर्माण झाल्याचे आमदार राठोड यांनी सांगितले. निवड झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांचा याचिकेशी संबध नाही तसेच ज्या उमेदवारांच्या अंतिम निकालावर या याचिकेच्या अंतिम निकालाचा परिणाम होणार नाही अशा पात्र उमेदवारांना रुजू करुन घ्यावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

सामान्य प्रशासन विभागाची दिरंगाई 


मुळ समांतर आरक्षणाविषयी शासनाची बाजू मांडण्याकरीता महाधिवक्ता यांची उपस्थिती अनिवार्य असल्याचे समजते. महाधिवक्ता यांच्या अनुपस्थितीमुळे न्याय निर्णय होवू शकलेला नाही. निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीकरीता मंत्रालयीन उंबरठे झिजवावे लागत असल्याने नोकरीच्या सुरवातीसच नैराश्याची भावना निर्माण होत आहे. नियुक्ती आदेश निर्गमित करणारा सामान्य प्रशासन विभाग हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असून देखील होत असलेली दिरंगाई ही खेदजनक असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.