Breaking News

मलकापूर पालिकत नगरसेवक पदासाठी 45 अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी 2 अर्जकराड (प्रतिनिधी) : मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेवारांनी दाखल केलेले अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज (गुरूवार) रोजी नगराध्यक्षपदासाठीचे तीन तर नगरसेवकपदाच्या 12 उमेदवारांची आपले अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे मलकापूर नगरपालिका निवडणूकीच्या रिंगणात नगराध्यक्ष पदासाठी 2 तर नगरसेवक पदासाठी 45 अर्ज बाकी राहिले असून या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. 


नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या अश्‍विनी मोहन शिंगाडे, रजनी सुभाष माने व सविता संजय या ओबीसी महिला उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर नगरसेवक पदासाठीच्या प्रभाग 2 मधून सर्वसाधारण प्रवर्गातील राजू कासम मुल्ला (2 ब), सुनील रामचंद्र जाधव (2 ब), प्रभाग 3 सर्वसाधारण महिला प्रवर्गातील शिल्पा शंकर पाटोळे (3ब), प्रभाग 4 मधून अमर नारायण इंगवले (4 ब), दादा बाबू शिंगण (4 ब) व संगीता दादा शिंगण (4 अ), प्रभाग 5 मधून कल्पेश सुखदेव सोनवणे (5 अ), प्रभाग 6 मधून सद्दाम अशापाक मुल्ला (6 अ) व नूरमुहम्मद नजीर शेख (6 अ), प्रभाग 8 मधून रुपाली मनोज माळी (8 अ) व प्रभाग 9 मधून सुनील यशवंत कोळी (9 क) व रंजना अशोक पाचूंंदकर (9 ब) यांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. 


त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी दोनच उमेदवारी अर्ज बाकी राहिल्याने काँग्रेसच्या उमेदवार नीलम संजय येडगे व भाजपच्या सारिका प्रशांत गावडे यांच्यामध्ये थेट नगराध्यक्ष पदासाठी समोरासमोर लढत होणार आहे. 


नगरसेवक पदासाठी शेवटच्या दिवशी 12 उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आल्याने निवडणूक रिंगणात 45 उमेदवार बाकी असून यांच्यामध्ये नगरसेवक पदासाठी लढत होणार आहे. शुक्रवारी 18 रोजी दुपारी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे. याचवेळी उमेदवारांना चिन्हवाटप करण्यात येणार आहे. नवनिर्मित मलकापूर नगरपालिकेसाठी 27 जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार असून 28 रोजी सकाळी 10.30 वाजता मतमोजणीस सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी अंतिम निवडणूक निकाल जाहीर करण्यात येणार आहे.