Breaking News

श्‍वेता महाले यांच्या प्रयत्नातून सातगाव भूसारी पाझर तलावाला मान्यता 4 कोटीचा निधी झाला मंजूर, ना. राम शिंदे करणार भूमिपूजन
चिखली,(प्रतिनिधी): तोकडे पर्जन्यमान असलेल्या चिखली तालुक्यातील शेतकर्‍यांना बारमाही सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी थडपड करणार्‍या भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्या तथा जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती श्‍वेता महाले यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. तालुक्यातील सातगाव भूसारी येथील पाझर तलावाच्या प्रस्तावास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून त्यासाठी 4 कोटी 4 लाख 18 हजार 400 रूपयांचा निधी देखील मंजूर केला आहे.

 विदर्भातील अनुशेष भरून काढण्यासाठी फडणवीस सरकारने घेतलेला हा आणखी एक निर्णय आहे. विद्यमान आमदारांचे दुर्लक्ष व काँग्रेस आघाडी सरकारच्या विदर्भाशी असलेल्या सापत्न वागणूकीमुळे हा सातगाव भूसारी येथील पाझर तलाव 9 वर्षे रेंगाळत पडला होता. या सिंचन प्रकल्पाच्या सुधारित प्रस्तावास मान्यता मिळवून दिल्याबद्दल श्‍वेताताई महाले  यांनी जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी आणि श्रमिक वर्ग समृद्ध झाला तरच खर्या अर्थाने समाज व देशाची प्रगती होईल याची जाणीव असलेले नेतृत्व म्हणून श्‍वेताताई महाले पाटील यांचे नाव तालुक्यातील सर्वांच्या मुखात आहे. त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि विकास कामांचा झंजावात सर्वांसाठी कौतुकाचा विषय आहे. खेड्यातील बळीराजाला सुखी समाधानी करण्यासाठी सतत झटणार्‍या श्‍वेताताई महाले यांचा एक महत्त्वाचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. तालुक्यातील सातगाव भूसारी येथील नाल्यावर पाझर तलाव बांधण्याचा 9 वर्षापासून खोळंबलेल्या प्रकल्पाच्या सुधारित प्रस्तावाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून या कामासाठी 4 कोटीचा निधी सुध्दा मंजूर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारच्या कार्यकाळात रस्ते विकासाबरोबर सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होत आहे. जलद दळणवळण आणि सिंचन सुविधा या दोन्ही गोष्टी भाजपा सरकार कडून प्राधान्याने पूर्ण केल्या जात आहेत.

याचाच भाग म्हणून 9 जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार हा पाझर तलाव मंजूर झाला आहे. या प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी आपण स्वतः येणार असल्याचे आश्‍वासन राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी श्‍वेताताई महाले यांना दिले आहे.         चिखली तालुक्यासह मतदारसंघातील जनसमस्या सोडवण्यात व या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी श्‍वेताताई महाले पाटील सदैव अग्रेसर असतात. आपल्या परिसरातील शेतकर्यांना बारमाही पाणी उपलब्ध झाल्यास परिसराचे चित्र पालटेल अशी भूमिका त्या नेहमी घेतात. त्यासाठी गावोगावी होणार्‍या भेटीमध्ये त्या शेतकरी व गावकर्‍यांशी संवाद साधतात. बर्याच वेळा गावातील शिष्टमंडळे श्रीमती महाले यांना भेटून आपली मागणी त्यांच्या समोर मांडतात. अशीच त्यांची भेट सातगाव भूसारी येथील शिष्टमंडळाने घेतली असता गावातील नाल्यावरील प्रस्तावित पाझर तलावाच्या रेंगाळलेल्या प्रस्तावाला मार्गी लावण्याची मागणी श्‍वेताताई महाले पाटील यांच्याकडे केली होती. सरपंच बाबुराव देशमुख तसेच सुरेश जाधव, दुर्गादास सोनाळकर आणि संतोष बकाल यांच्या मागणीवर श्‍वेताताई महाले यांनी लगेच हालचाल सुरू केली.

 सदर सिंचन प्रकल्पाला 2009 - 10 मध्ये मान्यता मिळून देखील हे काम थंड बस्त्यात पडले होते. श्रीमती महाले यांनी ग्राम पंचायतीकडून 142. 82 सलघमी साठवण क्षमता असलेल्या या प्रकल्पासाठी सुधारित प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, औरंगाबाद यांच्या मार्फत राज्य शासनाकडे सादर केला. एवढ्यावर न थांबता त्यांनी प्रस्तावाचा सातत्याने पाठपुरावा केला. मंत्रालय स्तरावरुन हा पाझर तलाव मंजूर करण्याच्या कामात आ. डॉ. संजय कुटे यांची मदत व मार्गदर्शन श्‍वेताताई महाले पाटील यांना मिळाले. सातगाव भूसारी येथील होऊ घातलेल्या पाझर तलावामुळे या परिसरातील विहीरींची पाणी पातळी वाढणार असून पिकांसह जनावरे आणि गावकर्‍यांच्या पेयजलाचा प्रश्‍न सुटण्यासही मदत होईल. 

       विकास कामाला नेहमीच अग्रक्रम देणार्या श्‍वेताताई महाले यांनी सर्वच आघाडयांवर विकास कामे सुरू केली आहेत. याशिवाय बर्याच काळापासून रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी सुध्दा त्या प्रयत्न करत आहेत. विद्यमान आमदारांनी दुर्लक्ष केलेल्या सातगाव भूसारी येथील प्रकल्पाचे श्‍वेताताईंनी हाती घेतलेले पुनरूज्जीवन हे त्याचेच उदाहरण आहे. या पाझर तलावाच्या सुधारित प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देऊन 4 कोटी रुपयांची निधी मंजूर केल्या बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच यासाठी सहकार्य करणारे आ. डॉ. संजय कुटे यांच्या प्रति श्‍वेताताई महाले पाटील यांनी आभार मानले आहेत.