Breaking News

एनआयएची पुन्हा छापेमारी, 5 जणांना अटक


नवी दिल्ली ‘हरकत उल हर्ब-ए-इस्लाम’ या दहशतवादी संघटनेचा घातपात घडवण्याचा कट गेल्या 26 डिसेंबर रोजी उधळून लावल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी पुन्हा छापेमारी केली आहे. यात उत्तरप्रदेशातील अमरोहा आणि दिल्लीतील जाफराबाद, सीलमपूर परिसरात छापा मारण्यात आला. यादरम्यान आणखी 5 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला. 

यापूर्वी 26 डिसेंबर रोजी एनआयएने उत्तरप्रदेश आणि दिल्लीतील एकूण 17 ठिकाणी चालवलेल्या धाडसत्रात 16 संशयितांना ताब्यात घेतले होते. उत्तरप्रदेशातील मेरठ, लखनऊ, हापूड, अमरोहा, सेलमपूर आणि दिल्लीत हे धाडसत्र राबवण्यात आले होते. यावेळी ताब्यात घेतलेल्या 16 जणांपैकी 10 जणांना अटक करण्यात आली होती. या संशयितांना जेथून ताब्यात घेण्यात आले,त्या ठिकाणाहून एक रॉकेट लाँचर, 12 पिस्तुले, अन्य शस्त्रे, 100 नवे कोरे मोबाइल फोन,135 सिमकार्ड आणि मेमरी कार्ड आणि दारूगोळ्याचा मोठा साठाही हस्तगत करण्यात आला. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या 10 जणांना 12 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी झालेल्या चौकशीत पुढे आलेल्या माहितीनंतर सोमवारी पुन्हा छापेमारीची कारवाई करत 5 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.