Breaking News

बहुजननामा (55 वी खेप) - तो 15 दिवसांचा थरार....! (भाग-4)


बहुजनांनो.... !
जातीव्यवस्थेची जी अनेक अंगभूत वैशिष्टे आहेत, त्यापैकी एक वैशिष्ट्य जे निश्‍चितपणे समाजकारण, अर्थकारण व राजकारणावर परिणाम करते. ब्राह्मण व क्षत्रिय जातींची दहशत ही बहुतेक सर्वच एस.सी, एस.टी. व ओबीसी जातींवर प्रभाव गाजवीत असते. ही दहशत उतरत्या क्रमात चढत्या भांजणीत असते. या दहशतीवर मात करण्यासाठी प्रचंड मानसिक ताकत कमवावी लागते. यात नैतिकता व प्रामाणिकता या दोन बाबी फार महत्वाच्या असतात. शुद्रादिअतिशूद्रांकडे असलेली ही दोन हत्यारे अशी आहेत, की ती कधीच कोणी हिसकावून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे ज्या नेत्या-कार्यकर्त्याकडे ही हत्यारे आहेत, तो कितीही कनिष्ठ जातीचा असला तरी त्याचे लढाईतील मनोधैर्य कोणीच खच्ची करू शकत नाही.

या 15 दिवसांच्या लढाईत आमचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी शत्रूंनी अनेक अडथळे आणलेत. मानसिक त्रास सर्वात मोठा असतो. परंतू असा त्रास होतांना तात्यासाहेब महात्मा फुलेंचा एक आदर्श नेहमीच डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. अनेक अडथळे आणूनही तात्यासाहेब आपले स्त्री-शिक्षण व अस्पृश्य शिक्षणाचे काम थांबवत नाहीत, असे लक्षात आल्यावर पुणे नगरपालिकेतील ब्राह्मणांच्या सांगण्यावरून त्या भागातील कचरा व घाण तात्यासाहेबांच्या घराच्या मागे भिंतीला लागूनच टाकायला सुरूवात झाली. त्यामुळे प्रचंड दुर्गंधी यायला लागली व घरात राहणेही अशक्य व्हायला लागले. परंतू तरीही तात्यासाहेबांनी एकही तक्रार केली नाही. तो त्रास ते गुपचूप सहन करीत होते. याचे साधे कारण असे आहे की, शत्रूकडून होणार्या त्रासाबद्दल नेत्याने गवगवा केला की, त्याचा सर्वात मोठा वाईट परिणाम सोबतचे मित्र वा कार्यकर्त्यांवर होत असतो. नेत्याला त्रास देऊन कार्यकर्त्यांवर अप्रत्यक्षपणे दहशत निर्माण करण्याची ही एक पध्दत आहे. शत्रूने दिलेल्या त्रासाबद्दल आपणच गवगवा केला तर, सोबतचे मित्र व कार्यकर्ते आपल्यापासून लांब जातात. ही अप्रत्यक्ष दहशत असते, जी नेत्यावर नव्हे तर सोबतच्या मित्र-कार्यकर्त्यांवर परिणाम करते. तात्यासाहेबांचा हा आदर्श लक्षात ठेवून मी सर्व प्रकारचा त्रास गुपचूप सहन केला व करीत आहे.
शत्रूंकडून जसे त्रास देण्याचे प्रयत्न झालेत, त्यापेक्षा जास्त प्रयत्न मित्रांकडून झालेत. शत्रूंनी दिलेला त्रास गुपचुप सहन केला तर तो लपून राहतो, मात्र मित्रांनी आपले मनोधैर्य खच्ची करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या कारवाया केलेल्या असतात, त्या लपवून ठेवता येत नाही. कारण ऐन लढाईत आपली साथ कोण सोडणार आहे किंवा कोण अडथळे आणणार आहे, याची स्पष्ट कल्पना जर तुम्हाला नसेल तर चळवळीचा घात होऊ शकतो. एरवी शांततेच्या काळात सर्वच मित्र असतात व एकत्रीत चर्चाही करीत असतात. पण जसजसा संघर्ष तीव्र होत जातो, तसतसे मित्र कोण व शत्रू कोण याची स्पष्टता होत जाते. पुसट रेषा ठळक होत जातात. पांढरे स्वच्छ दिसणारे चेहरे अधिक भडक व गडदही होत जातात. काही तर भेसूर वाटायला लागतात. ही झाली रेषेच्या पलिकडची गोष्ट, जी गृहीतच असते. मात्र रेषेच्या अलिकडील आपल्याच मित्रांचे वागणे माणसाला अस्वस्थ करून जाते. जे लोक फेसबवूक व्हाट्सपवर लाईक करायला व सपोर्टींग कमेंट करायला थकत नव्हते, त्या लोकांच्या लाईक घटत गेल्यात. शत्रूंकडून फेसबुक-व्हाट्सपवर मला अश्‍लिल शिव्यांचा भडिमार सुरू झाल्यावर बहुतेक सर्व फेबुफ्रेंड गायबच झालेत. लाईक करायलाही घाबरत होते. कमेंट करणे तर दुरच! एकमात्र सुरेश चरडे व प्रविण वाघ नावाचे दोन तरूण फेसबुक व यु ट्युबवर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीलेत. या तरूणांना मी यापूर्वी कधीच कोठे पाहिले नाही व भेटलोही नाही. या 15 दिवसांच्या लढाईत हे तरूण अचानक उगवले व माझे खंबीर पाठीराखे बनले. अजूनही सुरेश चरडें व प्रविण वाघ बद्दल मी अनभिज्ञच आहे.
शांततेच्या काळात जे अनेक ओबीसी नेते डरकाळ्या फोडत होते, ते बहुतेक गायब झालेत. ओबीसीतील बरेचसे यशस्वी भाषणकर्ते जे एकेका भाषणाचे 20 ते 30 हजार रूपये रोख मोजून घेत होते व आक्रमक भाषणे करून टाळ्याही मिळवीत होते, तेही बीळात लपून बसलेत. यांनी ‘ओबीसी’ असल्याचे सर्व राजकीय-आर्थिक फायदे उपटलेत व अजूनही उपटत आहेत. मात्र ओबीसीसाठी लढाई सुरू होताच हे सर्व लाभार्थी बीळात लपून बसलेत. ते बीळातून बाहेर यावेत म्हणून मी त्यांच्यासाठी एक अश्‍लील शिवीगाळ करणारी पोस्ट टाकली. 29 तारखेला धरणे आंदोलन चालू असतांना मराठा आरक्षणाचे बील मंजूर होताच एक विचारवंत बीळातून बाहेर पडलेत. उशिरा का होईना मित्र साथ देण्यासाठी बाहेर पडला म्हणून आनंद झाला. मला वाटले ते थेट आझाद मैदानावर येतील, पण नाही आलेत. काही हरकत नाही. ते गेलेत डायरेक्ट टि.व्ही. चॅनलवर! संध्याकाळच्या चर्चेत मीही सहभागी होतो. मराठा आरक्षणाचे बील पास झाले या बद्दल एंकर ने विचारणा करताच हे महाशय मोठ्या आनंदाने म्हणाले की, “आता आजपासून आमचे ‘जाणते राजे’ ओबीसी झाले आहेत व ते आता निश्‍चितच ओबीसी म्हणून प्रधानमंत्री होतील!’’ त्यांचे हे वाक्य ऐकल्यावर माझी खात्री झाली की हे महाशय माझ्या अश्‍लिल पोस्टमुळे बीळातून बाहेर आलेले नव्हते, तर ते आपल्या मराठा मालकाला ‘ओबीसी प्रधानमंत्री’ डिक्लेयर करण्यासाठी बाहेर पडले होते.
या 15 दिवसात लढाई ऐन भरात असतांना लढणार्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे जे अनेक कार्यक्रम झालेत, ते काही योगायोग म्हणून झाले नाहीत. त्यामागे शत्रूंचीही योजना असते. मराठ्याला “ओबीसी प्रधानमंत्री’’ डिक्लेयर करणे, एवढ्यावर भागले नाही. तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या नावाने दरवर्षी 28 नोव्हेंबरला फुलेवाड्यावर पुरस्कार दिला जातो. ओबीसी-मराठा संघर्ष सुरू असतांना या वर्षीच्या महात्मा फुले पुरस्कारासाठी मराठा जातीतील हे भावी ‘ओबीसी प्रधानमंत्री’च कसे सापडले? याला निव्वळ योगायोग कसे म्हणणार? तिसरे आणखी एक बुद्धिमान आहेत ज्यांना दहशतीच्या बीळातून बाहेर पडण्यासाठी मराठा माणूसच सोबतीला लागला. ‘मराठा समाजाला ओबीसीमध्येच आरक्षण मिळायला पाहिजे’, अशी भुमिका मांडणार्या मा. म. देशमुखांना पुरस्कार देऊन आमची ओबीसी चळवळ धन्य धन्य झाली. तिकडे बामसेफ तरी कशी मागे राहील? त्यांनीही ओबीसींचे खच्चीकरण करण्यासाठी कट्टर ‘मराठा आरक्षणवादी’ माणूस बामसेफ अधिवेशनात आणून स्वतःच्या “अ-आंबेडकरवादाचे’’ उद्गाटन करून घेतले. यात मी मित्रांची नावे टाकलेली नाहीत, याचे कारण हे आहे कि, आम्हाला आधीच शत्रूंची कमतरता नाही, त्यात नव्या शत्रूंची भर नको. ज्याने-त्याने प्रामाणिकपणे आपले स्वतःचे ‘आत्मपरिक्षण’ करावे व ओबीसी चळवळीला आपापल्या परीने हातभार लावावा. काही करता येत नसेल तर उगाच आव आणून ‘काहीही’ करायचा प्रयत्न करू नका. घरात शांत बसून राहणे ही सुद्धा चळवळीला मदतच असते.
ओबीसी आरक्षण संकटात असतांना व त्यासाठी आम्ही लढत असतांना असे काही निराशजनक प्रकार घडलेत. अर्थात अशा खच्चिकरणाला आम्ही फाट्यावर मारतो. ते आमच्या पाचवीलाच पूजले आहे. 90 च्या दशकात मंडल आयोगाचे सर्वात कट्टर समर्थक असलेले देशपातळीवरचे सर्वोच्च ‘बहुजन-नेते’, मंडल आयोग लागू होत असतांना मान्यवर व्हि.पी. सिंगांचे खच्चिकरण करण्यासाठी देविलाल सोबत सभा घेत होते व व्ही.पी. सिंगांचे सरकार पाडण्याचे आवाहन करीत होते. अशी अनेक उदाहरणे आहेत.
दरम्यान प्रकाश आण्णा व हरिभाऊ मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी प्रयत्नशील होतेच. 28 तारखेला बील तयार झाल्यावर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून निरोप आला. आमचे ओबीसींचे शिष्टमंडळ मंत्रालयात आले. तेथे आम्हाला काही ओबीसी व एस्सी विद्यार्थी भेटलेत. ते समांतर आरक्षणाचे बळी होते. त्यांनी आम्हाला शिष्टमंडळात सामील करून घेण्याची विनंती केली. ते अनेक आमदार व मंत्र्यांकडे जाऊन भेटून आले होते, मात्र त्यांचा प्रश्‍न सुटत नव्हता. मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटले तरच हा प्रश्‍न सुटेल. म्हणून आम्ही त्यांन सोबत घेतले. प्रकाश आण्णा माननीय छगन भुजबळसाहेबांना भेटायला गेलेत. आण्णांनी भुजबळसाहेबांना विनंती केली की, आपण ओबीसींच्या शिष्टमंडळात सामील होऊन आमचे नेतृत्व करावे’. मात्र भुजबळसाहेबांनी ओबीसी शिष्टमंडळात सामील व्हायला स्पष्टपणे नकार दिला. मुख्यमंत्र्यांशी प्रत्यक्ष चर्चेत आम्ही आमचे मुद्दे मांडलेत. मुख्यमंत्री ठासून सांगत होते की, ‘मराठ्यांचा प्रवर्ग वेगळा आहे व ते मुळ खर्या ओबीसीत कधीच शिरकाव करू शकणार नाहीत.’ ‘पण जर वरचे 16 टक्के आरक्षण कोर्टात टिकले नाही तर, ते एस.ई.बी.सी. म्हणून मूळ ओबीसीतच येतील’, अशी शंका आमच्याकडून व्यक्त होताच ते म्हणाले की, ‘जो पर्यंत मी मुख्यमंत्री आहे, तो पर्यंत मी असे काहीहि होऊ देणार नाही.’ याचा स्पष्ट अर्थ असा की, पुढच्या काळातही मीच मुख्यमंत्री राहील याची काळजी ओबीसींनी घेतली पाहिजे. डोक्यावर तलवार लटकती ठेवायची व मलाच पुन्हा मुख्यंमत्री करा, नाही तर तलवार तुमच्या डोक्यातच घुसेल, असा दमही द्यायचा! ओबीसींच्या कृपेने सत्तेवर आलेले मुजोर लोक ओबीसींच्याच डोक्यावर तलवार टांगत आहेत. मात्र ओबीसी जागा होतो आहे. निवडणूका आल्यावर तीच तलवार काढून तुमच्या बहुमताचे मुंडके ओबीसीच छाटणार आहे. शिष्टमंडळात असलेल्या विद्यार्थ्यांनी आपले गार्हाणे मांडताच मुख्यमंत्र्यांनी त्यांना गप्प बसविण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही आक्रमक झालो व परिणामी मुख्यमंत्र्यांना त्यांचे गार्हाणे ऐकूण घ्यावेच लागले. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘4-5 दिवसातच मी तुमचा प्रश्‍न सोडवतो. ओपनच्या 50 टक्के जागा या सर्व जाती-धर्मांसाठी खूल्याच राहतील,’ असेही स्पष्ट केले. 5 दिवसाच्या आतच मुख्यमंत्र्यांनी जी.आर. काढला व हजारो ओबीसी-एस्सी-एस्टी व भटक्याविमुक्त विद्यार्थ्यांचे नोकरी मिळण्याचे मार्ग मोकळे झाले. ज्या विद्यार्थ्यांना आम्ही शिष्टमंडळात सामील करून घेतले होते, त्यांचे आभार मानणारे फोन आलेत. नंतर फुकटचे श्रेय घेणार्या नेत्यांनी उगाच पत्रके काढून आपली चमकोगिरी करून घेतली. 29 नोव्हेंबला आमचे आझाद मैदानावर धरणे आंदोलन चालू असतांनाच विधानसभेत मराठा आरक्षणाचे बील एकमताने मंजूर झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जाहीर केले. त्यानंतर आझाद मैदानवर पत्रकार व टि.व्ही. चॅनल्सची गर्दी वाढली. आम्ही धरणे आंदोलनाच्या स्टेजवरूनच जाहीर केले की, ओबीसींच्या व एकूणच जातीअंताच्या इतिहासातील ही काळीकुट्ट घटना असून आजचा 29 नोव्हेंबरचा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून नोंद होईल!
15 नोव्हेंबरपासून सुरू झालेला थरार 29 नोव्हेंबरला एक पर्व पूर्ण करून दुसर्या पर्वात आला आहे. त्याचाही आढावा पुढील बहुजननामात घेऊ या, तो पर्यंत जयजोती जयभीम! सत्य की जय हो....!!