Breaking News

पाटणला 55 बंदुका जप्त
पाटण/प्रतिनिधी : पाटण येथील शस्त्र परवानाधारक विक्रेते प्रकाश शंकर यादव यांनी त्यांच्याकडे विक्रीस असणारी शस्त्रे अधिकृत व मान्यताप्राप्त परवाना असलेल्या नोंदणीकृत दुकानात न ठेवता ती बेकायदेशीररित्या स्वतःच्या घरात ठेवून कायद्याचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. पाटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी अंगद जाधवर यांच्यासह पाटण पोलिसांनी छापा टाकून यादव यांना ताब्यात घेत त्यांच्याजवळील सिंगल व डबल बारच्या 55 बंदुका जप्त केल्या.

यादव (रा. पाटण) यांच्या नावावर अग्निशमन व गोळीबार साहित्य, शस्त्रे विक्री व दुरूस्तीचा परवाना आहे; परंतु ते हे सर्व साहित्य अधिकृत ठिकाणी न ठेवता बेकायदेशीररित्या आपल्या राहत्या घरी ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मोरेगल्ली पाटण येथील प्रकाश यादव यांच्या घरी अचानक छापा टाकला. या छाप्यात यादव यांनी ही शस्त्रास्त्रे बेकायदेशीररित्या घरात ठेवल्याचे सापडले. त्यानंतर पोलिसांनी ही सिंगल व डबल बारची तब्बल 55 शस्त्रे जप्त केली. प्रकाश यादव यांना अटक केली. या प्रकरणी शस्त्र कायदा कलमान्वये यादव यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रसंगी पोलिस उप विभागीय अधिकारी अंगद जाधवर, सहायक पोलिस निरीक्षक उत्तमराव भापकर, सहाय्यक फौजदार पी. एन. पगडे आदींनी ही कारवाई केली.