Breaking News

खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांत 57 पदकांसह महाराष्ट्र अव्वल

खेलो इंडिया क्रीडा साठी इमेज परिणाम


पुणे : पुण्यातल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी चमकदार कामगिरी बजावली आहे. 57 पदकांची कमाई करत तिसर्‍या दिवसअखेर महाराष्ट्राने पदकतालिकेत आघाडी घेतली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राने आतापर्यंत 15 सुवर्ण, 19 रौप्य आणि 23 कांस्य अशा 57 पदकांची कमाई केली आहे.

दिल्लीच्या मुलामुलींनी 13 सुवर्णपदकांसह एकूण 36 पदकं पटकावली आहेत. हरयाणाने तिसर्‍या दिवसअखेर 12 सुवर्णपदकांसह एकूण 40 पदकं मिळवली आहेत. दिल्ली आणि हरयाणा पदकतालिकेत अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर आहेत. महाराष्ट्राचा नव्या दमाचा पैलवान दिग्विजय भोंडवेला खेलो इंडियात कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. खेलो इंडियातल्या 21 वर्षांखालील मुलांच्या ग्रीको रोमन कुस्तीत त्यानं 97 किलोचं कांस्यपदक मिळवलं. दिल्लीत नुकत्याच झालेल्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत दिग्विजय हा 97 किलोत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता. खेलो इंडियात दिग्विजयला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं असलं, तरी त्याची कामगिरी अपेक्षा उंचावणारी आहे.

महाराष्ट्राच्या सौरभ रावत याने 1500 मीटर्स धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकून अ‍ॅथलेटिक्समध्ये शानदार कामगिरी केली. महाराष्ट्राच्या ताई बामने हिने 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक पटकाविले. मुलांच्या 17 वषार्खालील गटात सौरभ 1500 मीटर अंतर 4 मिनिटे 22.15 सेकंदात पार केले. उत्कंठापूर्ण शर्यतीत त्याने तामिळनाडूच्या बी. माथेश 4 मिनिटे 22.22 सेकंद याच्यावर मात केली. उंच उडीत धैर्यशील गायकवाड याने 17 वषार्खालील गटात उंच उडीत रौप्यपदक पटकाविले. धैर्यशील व पंजाबचा रॉबिनदीप सिंग यांनी प्रत्येकी 1.98 मीटर्सपर्यंत उडी मारली. तथापि रॉबिन याने कमी प्रयत्नात हे अंतर पार केल्यामुळे त्याला सुवर्णपदक मिळाले. धैर्यशील याला दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

 त्याचा सहकारी दत्ता याने 1.92 मीटर्सपर्यंत उडी मारली व तिसरे स्थान घेतले. मुलांच्या 21 वषार्खालील गटात नायर याने 14.98 मीटरपर्यंत गोळाफेक करत तिसरा क्रमांक पटकावला. दिल्लीचा साहिबसिंग 18.18 मीटर आणि उत्तरप्रदेशचा सत्यम चौधरी 16.54 मीटर यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकाचे मानकरी ठरले.