Breaking News

पालिकेत 800 कोटींचा भूखंड घोटाळा, ईडीकडून चौकशीची मागणी


मुंबई : लोअर परळ येथे 800 कोटींचा भूखंड घोटाळा झाला असून या घोटाळ्याची चौकशी ईडी तसेच अतिरिक्त आयुक्तांकडून करावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक अश्रफ आझमी यांनी केली. विकासकाने पालिका अधिकार्‍यांशी संगनमत करुन हा घोटाळा केला, असा खळबळजनक आरोप आझमी यांनी सुधार समितीत केला आहे.

गेल्या वर्षभरात मुंबई महापालिकेत जोगेश्‍वरी, कुर्ला, दहिसर येथील भूखंड घोटाळे गाजले आहेत. वर्षाच्या शेवटच्या दिवशी आणखी एक भूखंड घोटाळा उघडकीस आला. लोअर परळ येथे 800 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक अश्रफ आझमी यांनी सुधार समितीत केला. मुंबई महापालिकेच्या भूखंडाचा वापर करून त्यावर निकृष्ट दर्जाचे संक्रमण शिबिर संबंधित विकासकाने उभारले. कराराप्रमाणे बांधकाम 50 वर्ष टिकायला हवे, मात्र ते 10 वर्षातच निकृष्ट ठरल्याने पाडावे लागले. या प्रकरणी संबंधित विकासकाला दोषी ठरवून 70 कोटी रुपयाचा दंड पालिका प्रशासनाने आकारला. मात्र, त्या विकासकाने दंड भरण्यास नकार देत नव्याने संक्रमण शिबिर बांधून देण्याची तयारी दर्शवली. विकासकाने संक्रमण शिबिरातील सदनिका 225 चौ. फुटाच्या आकाराची बांधून त्याचे दोन भाग केले. त्यात दोन कुटुंबे वसवली. विकासकाने कराराचा भंग केला असून सर्व प्रकरणात त्याला 800 ते 1000 कोटी रुपयांचा फायदा झाला, असे आझमी म्हणाले.

या आरोपानंतर सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. घोटाळ्याची ईडी व अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी नगरसेवकांनी लावून धरली. विरोधी पक्षासह सत्ताधार्‍यांनीही चौकशीची मागणी केल्यानंतर सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. लोअर परळ, जी.के. मार्गावर पालिकेच्या मालकीचा भूभाग क्र. 437 हा भूखंड आहे. या भूखंडाचे क्षेत्रफळ 7094.54 चौ. मी. असून भूखंडांची किंमत कोट्यवधी रुपये आहे. हा भूखंड 1991 च्या विकास आराखड्यात बेघरांसाठी घरे बांधण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आला होता.