Breaking News

कराडकरांच्या मानगुटीवर 85 फुटी रस्त्याचे नवे भूत


कराड (प्रतिनिधी) : शहरातील भेदा चौक ते कार्वे नाका या नव्याने राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट झालेल्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी 85 फुटाचे नवे भूत कराडकरांच्या मानगुटीवर बसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. हे 85 फुटाचे भूत भेदा चौक ते कार्वे नाका रस्त्यालगत असलेल्या अनेक मिळकतदारांना त्रासाचे ठरणार आहे. कराडकर नागरिकांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पालिके मार्फत दत्त चौक ते भेदा चौक या या शंभर फुटी रस्त्याचे भूत अथक प्रयत्नातून कसेबसे खाली उतरले असतानाच 85 फूट रस्त्याचे नवे भूत उतरण्यासाठी संजय शिंदे यांनी पुन्हा एकादा पुढाकार घेतला आहे. त्यांनी याबाबत जनजागृती करत 85 फूट रस्त्याची भूत उतरवण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, कराड शहरातील भेदा चौक ते कार्वे नाका हा कराड तासगाव रस्ता केंद्र शासनाच्या निर्णयामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 266 असल्याचे दि. तीन जानेवारी 2017 रोजीच्या गॅझेटनुसार घोषित झाला आहे. त्यामुळे हा रस्ता भेदा चौकातून कार्वे नाक्यापर्यंत दोन्ही बाजूला 13-13 मीटर रुंदीकरण करण्यात येणार आहे. या कामाची प्रत्यक्ष कामकाज आजपासून झाले असून त्याचा फटका भेदा चौक ते कार्वे नाका या रस्त्यालगतच्या मिळकत धारक नागरिकांना बसणार आहे. रस्त्याच्या मध्यपासून दोन्ही बाजूला 13 मीटर म्हणजेच 85 फूट यामध्ये गटर्स व फुटपाथ होणार आहे.

मंगळवारी खाजगी ठेकेदारांकडून या रस्त्याची मोजणी करण्यात आली असून संभाव्य संपादीत जमीनच्या हद्दीत निश्‍चित करून खुणाचे दगड लावलेले आहेत. त्यानंतर भूमीअभिलेखाचे अधिकारी मोजमाप करून त्याचा अहवाल व होणारे नुकसान याच सविस्तर तपशील शासनाकडे प्रत्यक्ष पाठविणार असून बाधीत लोकांना नोटीसा काढल्या जातील. त्यावर लोकांनी आपले म्हणणे शासनासमोर मांडावयाचे आहे.

हा रस्ता पूर्वी 142 नंबरचा राज्य मार्ग होता. पळशी, कोरेगाव, रहिमतपूर, मसूर, कराड, पलूस, सांगली, जयसिंगपूर, शिरोळ या गावांना या राज्य मार्गाने जोडले जाते. त्याचे 3 जानेवारी 2017 पासून 266 नंबरचा राष्ट्रीय महामार्ग झाला आहे. कराडच्या विकास आराखड्यात हा रस्ता 50 फुटाचा रस्ता होता. सुधारीत आराखड्यामध्ये नंतर 60 फूटचा झालेला आहे. सध्या हा रस्ता पुरेसा रूंद असतानाही राष्ट्रीय महामार्गाच्या नावाखाली हा रस्ता 85 फूट करण्याचा घाट केंद्र शासनाने घातला आहे. यामुळे भेदा चौक ते कार्वेनाका दरम्यानच्या नागरिकांना याचा भूर्दंड सोसावा लागणार आहे. अनेकांच्या मालकीच्या जागा या रस्त्याच्या रुंदी करणासाठी संपादित केली जाणार आहे. हे नव्याने कराडकरांच्या मनगुटीवर बस पाहणारे 85 रस्त्याचे भूत उतरविण्यासाठी बाधित नागरिकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे 100 फूट रस्ता रद्द करण्यासाठी नागरिकांनी ज्यापद्धतीने कृती समितीच्या माध्यमातून लढा उभा केला होता. त्याच पद्धतीने हा 85 फूट रस्ता रद्द करण्यासाठी लढा उभारण्याची तयारी बाधित नागरिकांनी केली आहे. यासाठी 100 रस्ता विरोधीकृती समितीचे निमंत्रक संजय शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे.