अंढेरा येथे दरोडेखोरांचा धुमाकुळ; 87 हजारांचा मुद्देमाल लंपास


अंढेरा- देऊळगाव राजा- तालुक्यातील अंढेरा येथे पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिस पाटलांच्या घरीत सात ते आठ अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून जवळपास 87 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या दरोडेखोरांनी पोलिस पाटील यांच्या घरासोबतच परिसरातील मळा शिवार, म्हसोबा मंदिरराच्या परिसरातही गुरूवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास लुटमार करण्याच्या प्रयत्न केला. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत शकुंतला संतोष सानप, विष्णू शिवहरी कुटे, शिला विष्णू कुटे, आनंदी विठोबा सानप, सचिन तेजनकरसह अन्य काही जणांना चाकू व टामीच्या धाकावर मारहाण करून जखमी केले. दरम्यान, या घटनेमुळे अंढेरा परिसरात नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.


अंढेरा येथील पोलिस पाटील संतोष सानप हे त्यांच्या निवासस्थानी रात्री झोपलेले असताना गुरूवारी पहाटे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान पाच ते सात अज्ञात दरोडेखोरांनी चाकू व टामीने त्यांच्या घराचे दार उघडून आत प्रवेश केला. सोबतच त्यांची आई आनंदीबाई सानप यांना मारहाण करून त्यांच्या हातातील चांदीच्या पाटल्या, कानातील बाळ्या, मनी पोत असा 62 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सानप यांचे जावाई व मुलगीही योगायोगाने आलेले होते. त्यांनाही या दरोडेखोरांनी मारहाण केली. सानप यांच्या घरातील व्यक्तींच्या अंगावर असलेले सोन्या-चांदीचे दागिने लुटल्यानंतर या दरोडेखोरांनी पॉवर हाऊस नजीक असलेल्या मळा शिवारात धुमाकुळ घातला. सचिन आनंद तेजनकर यांच्यासोबतच दरोडखोराची झटापट झाली. त्यात दरोडेखोराने सचिन यांच्या तोंडावर टामी मारल्याने ते जखमी झाले. या भागातील तीन ते चार घरांना दरोडेखोरांनी बाहेरून कड्या लावून घेतल्या होता. याच दरम्यान चोरट्यांनी शेळके शिवारातील म्हसोबा मंदिराच्या परिसरातील एका गोठ्याचेही कुलूप तोडले. मात्र तेथून काही चोरी केली नाही. त्यानंतर दरोडेखोरांनी विजय हिंम्मतराव तेजनकर यांच्या गोठ्यावर काम करणार्‍या शशिकला प्रल्हाद डोंगरे यांच्या गळ्यातील डोरले व 30 मनी असा सुमारे 25 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. दरोडेखोरांजवळ एक मोठी गाडीही होती, अशी चर्चा आता गावात आहे. मात्र पोलिसांकडून त्यास पुष्टी मिळू शकली नाही.

या घटनेची माहिती जवळच सानप यांनी ठाणेदार कारेगावकर यांना दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक पहाटे त्यांच्या घरी पोहोचले. घटनेचे गांभीर्य पाहता उपविभागीय पोलिस अधिकारी नलावडे यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली. ठसे तज्ज्ञांचे पथक तथा श्‍वान पथकासही पाचारण करण्यात आले होते. या पथकाने चोरीचा उलगडा व्हावा, या दृष्टीकोणातून घटनास्थळी पाहणी करून आवश्यक माहिती गोळा केली. दरम्यान, दरोडेखोरांनी पलायन करताना टामी व अन्य काही साहित्य रस्त्यात टाकून दिले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget