Breaking News

नगराध्यक्षा कराडकरांची खाबूगिरी उघड करणार; कचरा डेपोप्रश्‍नावरून पाचगणीच्या 9 नगरसेवकांचा इशारा


कुडाळ (प्रतिनिधी) : संपूर्ण देशात स्वच्छ सुंदर, कचरामुक्त आदर्श नगरीचा पुरस्कार घेतलेल्या पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कराडकर यांनी स्वच्छ सुंदर पाचगणीच्या नावाखाली स्वतःच्या तुंबड्या भरल्या असल्याचा आरोप विद्यमान 9 नगरसेवकांनी केला असून त्यांचा नकली बुरखा फाडून जनतेसमोर खरं खोटं करण्याचा इशाराही दिला आहे.

याबाबत पत्रकारांशी बोलताना पाचगणीचे माजी उपनगराध्यक्ष नारायण बिरामणे, विनोद बिरामणे यांनी सांगितले की, पारदर्शकतेचा बुरखा पांघरून देशात स्वच्छ आणि सुंदर पाचगणीचा बहाणा करीत कोट्यवधी रुपयांची माया जमवणार्‍या विद्यमान नगराध्यक्षांनी पाचगणीला मिळालेला निधी स्वतः लाटत जनतेची दिशाभूल केली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या कचरा डेपोच्या कारभारामध्ये रोज हजारो रुपयांचा गोलमाल होत असून त्या माध्यमातून नगराध्यक्षाच ठेकेदाराच्या आडून माया जमा करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
नारायण बिरामणे यांच्यासमवेत अनिल वने, विजय कांबळे, पृथ्वीराज कासुर्डे, हेमा गोळे, रेखा कांबळे, नीता कासुर्डे, विनोद बिरामणे या 9 नगरसेवकांनी पाचगणीच्या कचरा डेपो वर अधिकृत कचर्‍याच्या गाड्या बाहेर जात असल्याचा आरोप करत घटना स्थळी कचर्‍याच्या गाड्या अडवत आज जोरदार हल्लाबोल केला.

कचरा डेपोच्या ठिकाणी झालेल्या प्रकल्प मशीनरी बंद आहेत. लाखो रुपयांचा अपहार व चुकीचा कारभार केला जात आहे. हा प्रकार व भोंगळ कारभार आता आम्ही चालू देणार नाही, असे सांगत पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण कचरामुक्त पाचगणीचा भांडाफोड लवकरच उघड करू, असा इशाराही त्या नउ जणांनी दिला आहे. 
यासंदर्भात सर्व पुरावे व कर्‍हाडकरांच्या खाबुगिरीचा लवकरच जनतेसमोर खुल्या व्यासपीठावर पर्दाफाश करण्याचा इशाराही दिला असून हा सर्व प्रकार पाचगणी पोलिस ठाण्यापर्यंत पोचला असून ऐन हिवाळ्यात गिरीनगरीतील वातावरण आता कमालीचे तापले आहे.