Breaking News

दिव्यांगांच्या मागण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा कचेरी समोर धरणे आंदोलन


बुलडाणा,(प्रतिनिधी): ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तीन टक्के निधी दिव्यांगांना देण्यात यावा, प्रधानमंत्री व रमाई घरकुल योजनेचा त्यांना लाभ देण्यात यावा, अतिक्रमण करून राहत असलेल्या जागेचा आठ अ देऊन त्याच जागेवर घरकुल देण्यात यावे, त्यांच्याकडील कर्ज माफ करावे, यासह अन्य मागण्यांसाठी 28 डिसेंबर रोजी रिपब्लिकन सेना अपंग सेलेच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. 

या आंदोलनाचे नेतृत्व अविनाश वाकोडे यांनी केले होते. या आंदोलनात असंख्य दिव्यांग बांधव व महिला सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील बहुतांश ग्रा.पं.नी अद्यापही तीन व पाच टक्के निधीचे दिव्यांगाना वाटप केले नाही. त्यामुळे व्यवसाय व उदरनिर्वाह कसा करावा, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना या निधीचे तातडीने वाटप करावे. तसेच ग्रामीण भागात अतिक्रमण करून राहणार्‍या अपंगांना त्याच जागेवर घरकूल बांधून द्यावे. अपंगाचे प्रमाणपत्र असलेल्या दिव्यांगाना दोन हजार रुपये मानधन द्या. मागील तीन महिन्यांपासून मानधनाचे अर्ज मंजूर होऊन ते मोताळा तहसील कार्यालयात पडून आहेत. परंतु अद्याप त्यावर कारवाई केली नाही. त्यामुळे ज्या अपंगांचे मानधन मंजूर झाले, ते त्यांच्या खात्यात जमा करावे. यासह अन्य मागण्या केल्या आहेत. या आंदोलनात संतोष धुरंधर, श्रीकृष्ण निकाळजे, रामा हिस्सल, अविनाश बामने, किशोर रायपुरे, वासुदेव ककर, कडूबा आडोळकर, सुदाम इंगळे, प्रभाकर इंगळे, सुनील हिवाळे, राजू हिवाळे, दगडू दलाल, संजय भाकर, मदन सरदार यांच्यासह दिव्यांग बांधव सहभागी झाले होते.