Breaking News

वाघोलीत विद्यालयासमोर गतिरोधकाची आवश्यकता


वाघोली (प्रतिनिधी) : येथील भारत विद्यामंदिर व शंकरराव जगताप आर्ट्स अ‍ॅन्ड कॉमर्स कॉलेजसमोरील रस्त्यावर गतीरोधकाची आवश्यकता असून गतीरोधकाअभावी लहान मोठे अपघात होत असल्याने स्थानिक राहिवाश्यांसह पालक, शिक्षक व वाहनचालकांतून चिंता व्यक्त होत आहे. वाघोली महाविद्यालयात पंचक्रोशीतील हजारो मुले मुली शिक्षण घेण्यासाठी येत असतात. या दोन महाविद्यालांच्या मध्यभागी वाई-वाठारस्टेशन डांबरी रस्ता गेलेला आहे. 


या रस्त्यावरून सतत वेगवान वाहनांची व रोडरोमिओंची ये-जा सुरु असते. एाळा आणि कॉलेज भरण्याच्या, सुटण्याच्या आणि मधल्या सुट्टीच्या वेळेस रस्त्यावर विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी झालेली असते. या गर्दीने तसेच वाहनांच्या ये-जा करण्यामुळे व दुचाकीस्वार रोडरोमियोंच्या वेगवान गाडी चालविल्याने या रोडवर खूप वेळा जीवघेणे अपघात झालेले आहेत व नेहमीच वारंवार होत असतात. 

या होणार्‍या अपघातांना कोणत्याही प्रकारचे अजूनपर्यंत निवारण करणेत आलेले नाही. वाघोली पूल येथील शाळा, कॉलेजच्या समोरील रस्त्यावर गतिरोधक बनविण्याची अत्यंत गरज आहे. गतीरोधक बनविल्यास शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा वेगवान वाहनांमुळे घडणारे अपघात टळतील, असे ग्रामस्थांसह शिक्षकांनी म्हटले आहे.