Breaking News

जिल्हाधिकारी यांनी साधला टाकळी विरो ग्रामस्थांशी ‘शेकोटी संवाद’
बुलडाणा,(प्रतिनिधी): ग्राम सामाजिक परिवर्तन मिशनअंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस. यांनी दहा जानेवारी रोजी शेगाव तालुक्यातील टाकळी विरो येथे रात्री भेट देऊन ग्रामस्थांशी ‘शेकोटी संवाद’ साधला. व्हीएसटीएफ अर्थात ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातंर्गत त्यांनी अचानक रात्री या गावाला भेट दिली. त्यामुळे ग्रामस्थही अचंबीत झाले.

या उपक्रमातंर्गत बुलडाणा जिल्ह्यातील 11 गावांची निवड झाली असून ते हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. दरम्यान, या गावात गेल्यानंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी ग्राम विकास आराखड्याबाबत ग्रामस्थांशी संवाद त्यांना या विषयावर मार्गदर्शन केले. दरम्यान, या प्रकल्पातंर्गत वाटप केलेल्या साहित्याची पाहणी ही त्यांनी प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या घरी जाऊन केली. तसेच ग्रामस्थांशीही चर्चा केली. अंगणवाड्यांना वाटप केलेले सौर ऊर्जेवरील दियव्यांचीही त्यांनी पाहणी करून ग्रामस्थांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या. सोबतच त्या त्वरेने निकाली काढण्याबाबत संबंधितांना सुचना दिल्या.

यावेळी उच्च प्राथमिक शाळेचेही त्यांनी उद्घाटन केले. दरम्यान, एक जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान केंद्रीय मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘स्वच्छ सुंदर शौचालय’ या स्पर्धेतंर्गत स्वच्छतागृहांची आणि विशेष अपंग विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या स्वच्छतागृहाचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांसोबत मध्यरात्री त्यांनी गावात ग्रामीण भोजनाचाही आस्वाद घेतला. त्यानंतर ग्रामस्थांशी शेकोडी संवादही साधला. पारंपारिक शेती, अधुनिक शेती पद्धती, शेती पुरक जोडधंदे यासह अन्य विषयावर चर्चा करून ग्रामस्थांना मार्गदर्शनही केले. पाणी, स्वच्छतेसहा विविध मुद्द्यावर यावेळी चर्चा करण्यात आली.

या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा नोडल अधिकारी अशोक तायडे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी नरेंद्र नाईक, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी यांच्यासह, ग्रामसेवक आर. आर. सावरकर, मुख्याध्यापक दामोदर, सरपंच पुष्पाबाई अरुण फाळके यांच्यासह अन्य उपस्थित होते.