Breaking News

वाई शहरातील दुभाजकांत फुलझाडांऐवजी कचर्‍याचे ढीग


मेणवली (प्रतिनिधी) : स्वच्छतेचा डंका पिटणार्‍या वाई शहरात प्रवेश करतानाच अस्वच्छतेच्या झालरीची कमान शहरात येणार्‍या नगरवासियांसह व पर्यटकांचे स्वागत करताना दिसत आहे, तर वाई बांधकाम विभागाने उभारलेल्या रस्ता दुभाजकात झाडांऐवजी कचर्‍याची लागण होत आहे तर पादचारी मार्गावर दुकानदारांनी कब्जा केला असल्याने नगरपालिकेने वाई शहरात राबवलेल्या स्वच्छता अभियानाची मोहीम फक्त कागदावरच राहिल्याची चर्चा वाईमध्ये चांगलीच रंगली आहे .

कृष्णाकाठची विराटनगरी असा लौकीक असणार्‍या वाई शहरात आगमनापासूनचे भिमनगर, बाजार समिती, बावधन नाका, काशी कापडी वस्ती, मिशन हॉस्पिटल ते वाईचे बसस्थानकादरम्यान उभारलले मुख्य रस्तादुभाजक व नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने बांधलेल्या पादचारी मार्गाची अतिक्रमणाने केलेली दयनीय अवस्था पहाता शासकीय अधिकारी व पदाधिकार्‍यानी वाई शहराच्या शुशोभीकरणाचे नुसते दिखाव्याचे देखावे उभे केल्याचे चित्र तमाम वाईकरांना अनुभवायला मिळत असल्याचे बोलले जात आहे. वाईत प्रवेश करताना आगमनाच्या सुरवातीलाच भीमनगर येथे रस्त्याच्या दुतर्फा पसरलेले घाणीचे साम्राज्य दक्षिण काशीमध्ये दुर्गंधीयुक्त स्वागत करतानाचा अनुभव देते. तर बांधकाम विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे बांधलेले रस्ता दुभाजक अनेकांचे बळी घेत प्रवाशांच्या मानेवर सतत मृत्यूची टांगती तलवार धरत आहे. याशिवाय प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे रस्त्यावरील दुभाजक शोभेच्या झाडांऐवजी कचर्‍याच्या ढिगाने भरू लागल्याने स्वच्छ वाई सुंदर वाईचा नारा कधीच हवेत विरून गेला आहे. दुसरीकडे वाई शहरातील नागरिकांच्या सुरक्षततेसाठी बांधलेल्य ापादचारी मार्गावर लगतच्या दुकानदारांनी आपले व्यावसायिक साहित्याचा संसार अस्ताव्यस्त मांडल्याने पादचारी मार्गाचा जीव गुदमरून गेल्याचे दिसून येत आहे. मात्र याचे कसलेही सोयरसुतक नगरपालिका व बांधकाम प्रशासनाला नसल्याने सर्व नागरिकांना जीव मुठीत धरून मुख्य रस्त्याचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे हे सर्व लक्षात घेता स्वच्छ भारत अभियान घोषणेचे फलक वाईमध्ये केवळ शोपीसच ठरले आहेत.

कचर्‍याने भरलेले दुभाजक झाडा फुलांनी कधी बहरणार? दुकानदार धंदेवाल्यांच्या अडगळीने बहरलेले पादचारी मार्ग कधी मोकळा श्‍वास घेणार? वाई शहराला आणलेली अवकळा कधी संपणार? का प्रशासन नुसत्याच घोषणा करणार? असे अनेक प्रश्‍न वाई शहरवाशीयांकडून विचारले जात आहेत.