Breaking News

...तर शहरात राष्ट्रवादीची गत काँग्रेससारखी होईल

सागर शिंदे
अहमदनगर/प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपुर्वी मनपात काँग्रेसचा महापौर होता. तसेच कोतकरांच्या काळात काँग्रेसचा दबदबाही होता. आता मात्र, शहरातून काँग्रेस नामशेष होत चालली आहे. केवळ कोतकरांच्या फितुरीनंतर पक्ष संपण्याची नामुष्की काँग्रेसवर आली. जर जगताप पिता-पुत्रांनी राष्ट्रवादी सोडली, तर राष्ट्रवादीचे काँग्रेसपेक्षा वेगळे काय होणार आहे? त्यामुळे शहरात राष्ट्रवादी जिवंत ठेवायची असेल तर, किंवा राष्ट्रवादीचा काँग्रेस करायचा नसेल तर पिता-पुत्रांची बंडखोरी पवारांना काय तर नाराज नेत्यांनाही सहन करावी लागणार आहे. हे चित्र उघड-उघड आहे.
पुर्वी ग्रामीण भागात इंदिरा गांधींच्या नावाला मतदारांचा कौल होता. काँग्रेस आणि हाताचा पंजा हे समिकरण अटूट होते. कारण मोफत जमीनींसह अनेक योजना प्रॉपर नगरिकांपर्यंत पोहचल्या होत्या. आता मात्र मतदारांची मागणी वाढली, जागरूकता वाढली, नातेगोते वाढले. त्यामुळे पक्षीय राजकारण संपून नात्यागोत्याचे राजकारण सुरू झाले. असेच काहीसे नगरच्या बाबतीत झाले आहे. पक्ष म्हणून नाही ती व्यक्ती म्हणून पक्षाला किंमत आहे. हे स्पष्ट दिसते आहे. खूप जूना काळ नाही. पण काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष भानुदास कोतकर हे काँग्रेसमध्ये असताना पक्षाचे स्थान किमान शहरात किंगमेकरच्या भूमिकेत असत होते. महापौर, उपमहापौर पदापासून तर कृषीउत्पन्न बाजार समिती व नगर तालुक्याचे राजकारण यात काँग्रेसचा झेंडा बेशक दिमाखात फडकत होता. कोतकरांना अशोक लांडे खून प्रकरणात जन्मठेप झाली, तरी काँग्रेस केडगावमुळे जिवंत होती. 12 ते 15 नगरसेवक निवडून आणण्याची कुवत कार्यकर्त्यांमध्ये होती. मात्र, कोतकरांनी एका रात्रीत काँग्रेसच्या डोक्यावरील हात काढला आणि अचानक केडगावात कमळ फुलले. एक व्यक्तीच्या आदेशाने काँग्रेस पुरती संपून केली. जे पाच नगरसेवक आले त्यांना अलिप्त राहण्यावाचून पर्याय शिल्लक राहिला नाही. काँग्रेसच्या तुलनेत बसपा पक्ष कित्तेक पटीने मोठा ठरला. यातून एक लक्षात आले की, येथे पक्षीय राजकारण नाही. तर वैयक्तीक व नात्यागोत्याचे राजकारण आहे.
काँग्रेसचा अधुनिक इतिहास पाहिला तर राष्ट्रवादीची सद्यस्थिती यापेक्षा वेगळी काही होईल असे वाटत नाही. कारण, राष्ट्रवादी पक्षापेक्षा येथे आमदार पिता-पुत्रांवर प्रेम करणारा वर्ग जास्त आहे. विशेष कोणी पक्षप्रेमी आहे. असे चित्र दिसत नाही. जगताप ज्या दिशेने जातील, त्या दिशेने नगरच्या राष्ट्रवादीची वाटचाल आहे. हे भाजप युतीने दाखवून दिले आहे. जर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जगतापांवर कारवाईची कुर्‍हाड चालविली तर त्यांना राष्ट्रवादीमुक्त नगर पहावयाचे घाव सोसावे लागतील. यात काही शंका नाही. कारण, दादा कळमकर यांच्यामागे किती जनाधार आहे. हे देखील सर्वश्रृत आहे. फळके किंवा तालुक्यातील कोणता नेता जगतापांना संताप आणू शकतो इतके प्रबळ कोणी नाही. शहराध्यक्ष माणिक विधाते यांची मजल पिता-पुत्रांच्या पुढे नाही. त्यामुळे जर कारवाईचा बडगा उठला, तर त्याचे परिणाम काय होतील. याचा विचार देखील पवारांना करावा लागणार आहे.
त्यामुळे जर जगताप यांच्यावर कारवाई झाली तर ऐन लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहरात पुन्हा एखादा ऐतिहासिक निर्णय पहावयास मिळू शकतो. आज राष्ट्रवादी लोकसभेच्या जाग्यावर आपला दावा दाखवत आहे. तर आमदारकीला देखील प्रबळ उमेदवार कोण? असा पहिला प्रश्‍न सोडवावा लागणार आहे. उमेदवार भरपूर मिळतील. मात्र, विजयाचा शिलेदार जगतापांशीवाय अशक्य आहे. हे देखील तितकेच खरे आहे. त्यामुळे येणार्‍या पाच तारखेस पवार काय निर्णय घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लगाले आहे.