Breaking News

शेतकरी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. सुरेश भोसले


कराड (प्रतिनिधी) : येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांची; तर उपाध्यक्षपदी व्ही. टी. पाटील यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या निवडी झाल्या. ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांनी सन 1962 मध्ये शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. 


या संस्थेअंतर्गत कृष्णा महाविद्यालय, छ. संभाजी विद्यालय, सौ. ताराबाई मोहिते विद्यालय, जयवंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड मॅनेजमेंट आणि जयवंतराव भोसले पॉलिटेक्निक कॉलेज अशा शैक्षणिक संस्था कार्यरत असून, या माध्यमातून सुमारे 4,500 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते यांच्या निधनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे संस्थेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड करण्यात आली. याप्रसंगी सचिव दिलीपराव पाटील, विश्‍वस्त मोहनराव मोहिते, संजय पवार, शकुंतला जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते.