Breaking News

गरीब सवर्णांच्या आरक्षणावर लोकसभेत चर्चा


संविधानातील 124 वी दुरुस्ती आहे, विधेयक मंजूर करण्यासंबंधीची तयारी 

नवीदिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गरीब सवर्णांना आरक्षण 10 टक्के आरक्षण जाहीर केले आहे. हे विधेयक लोकसभेत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांनी मांडले. याच विधेयकावर चर्चा सुरू झाली आहे. गहलोत यांनी विधेयक मांडताच समाजवादी पक्षाच्या खासदारांनी आक्षेप नोंदवत गोंधळ घातला; मात्र लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी खासदारांचा हा आक्षेप फेटाळला.
संविधानातील ही 124 वी दुरुस्ती आहे. विधेयक मंजूर करण्यासंबंधी सरकारने पूर्ण तयारी केली आहे. लोकसभेत उपस्थित राहण्यासाठी भाजपने खासदारांना व्हिप जारी केला होता. घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमताची गरज आहे. आता सुरू असलेल्या चर्चांमध्ये टीका आणि त्याला प्रत्युत्तर, समर्थन आणि त्यावर टीका पाहायला मिळते आहे. सध्याच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देता येण्याची तरतूद आहे, असे गहलोत यांनी विधेयक मांडताना स्पष्ट केले. गरीब सवर्णांना समाजातील मुख्य धारेशी जोडण्यासाठी हा निर्णय घेणे गरजेचे होते. या विधेयकाचा फायदा ख्रिश्‍चन, मुस्लिम यांच्यासहीत सगळ्यांना मिळणार आहे, असे त्यांनी नमूद केले. 

50 टक्के राज्यांचीही मंजुरी सवर्ण आरक्षणासाठी हवी अशी मागणी होती; मात्र या कायद्यासाठी राज्यांच्या मंजुरीची आवश्यकता नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. प्रत्येक नागरिकाला किमान एक संधी देणे आवश्यक आहे. ज्या समाजात जाती किंवा आर्थिक बाबींच्या मुद्यांवर अंतर होते. गरीब सवर्णांचा आधीच्या सरकारांनी विचार केलाच नाही. सबका साथ सबका विकास हे आमच्या सरकारचे लक्ष्य आहे त्याच अनुषंगाने आम्ही या संदर्भातले आरक्षण आणले आहे, असेही जेटली यांनी म्हटले आहे.
पटेल समाजाला आरक्षण द्या असे तुमच्या पक्षाने कधीही म्हटले नाही, अशी टीका करत लोकसभेत जेटली यांनी काँग्रेसला टोला लगावला. कोणत्याही धर्माचा माणूस असेल आणि तो जर गरीब असेल, तर त्याचा विचार व्हायला हवा. हे आमच्या सरकारला वाटते. त्याचमुळे आम्ही आत्ता हे आरक्षण घेऊन आलो आहोत, असेही जेटली यांनी म्हटले आहे. अनारक्षित गरीबांना आरक्षण देऊ, असे आश्‍वासन सध्याच्या विरोधी पक्षाने दिले होते; मात्र ते सोयीस्कररित्या त्यांचे आश्‍वासन विसरून गेले, अशीही टीका जेटली यांनी केली. सर्वांना समान संधी देण्याचा आमचा प्रयत्न होता, आहे आणि यापुढेही असेही असेही जेटली यांनी सांगितले.