Breaking News

विहेच्या सरपंचांचा देसाई गटाला रामराम


पाटण (प्रतिनिधी) : पाटण तालुक्यात देसाई गटातील कुरघोड्यांच्या राजकारणाला कंटाळून विहे गावच्या सरपंचांनी देसाई गटाला रामराम केला व ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डेरेदाखल झाले. त्यांच्या पक्षांतराने तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

विहे ग्रामपंचायतीत गेली साडेचार वर्षे देसाई गटाची सत्ता होती. अविश्‍वास ठरावामुळे अडचणीत आलेल्या सरपंच आनंदराव विठ्ठल मोरे यांनी तहसीलदारांच्या उपस्थितीत ठराव जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा ग्रामपंचायतीवर फडकविला.

विहे ग्रामपंचायतीचे सरपंच आनंदराव मोरे यांच्या विरुद्ध गेल्या आठवड्यात ग्रामपंचायत जागेवरील बेकायदेशीर अतिक्रमण केलेल्या संबंधीतास मदत केल्यामुळे देसाई गटाच्या सदस्यांनी त्यांच्यावर 1 जानेवारी 2019 रोजी अविश्‍वास ठराव मांडला होता. याबाबत पाटणचे तहसीलदार रामहरी भोसले, मल्हारपेठ येथील मंडल अधिकारी हणमंत शेजवळ, गाव कामगार तलाठी निवास पाटील, ग्रामविकास अधिकारी शिवाजी चंदुगडे व पोलीस पाटील हिम्मत पवार यांच्या उपस्थितीत विहे ग्रामपंचायतीत आज झालेल्या विशेष सभा घेतली. संबंधीत सर्व सदस्यांना तहसीलदारांच्यामार्फत विशेष सभेस बोलविण्याबाबत नोटीसा दिल्या. असता आज सकाळी 11 वाजता विशेष सभेस अकरा सदस्यापैकी पाच सदस्य गैरहजर तर सरपंचासह पाच सदस्य हजर राहिले होते. सरपंच आनंदराव मोरे यांच्या विरुद्ध कोणीही मतदान केले नसल्याने त्यांच्या विरुद्ध दाखल केलेला अविश्‍वास ठराव फेटाळल्यामुळे सरपंचपदी त्यांचीच वर्णी लागली. अतिक्रमण केलेल्या ज्या जागेमुळे सरपंच आनंदराव मोरे यांच्यावर अविश्‍वास ठराव आणला होता. त्या जागेवरील अतिक्रमण संबंधीतांनी एक दिवस अगोदरच काढून टाकले होते. त्यामुळे याबाबत गावात उलटसुलट चर्चा सुरू होती.विहे गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अविनाश पाटील, राहुल पाटील, रविंद्र पाटील, राजेंद्र पुजारी, संजय पाटील, विनायक मोरे, किरण पाटील, शेडगेवाडी सरपंच संतोष शेडगे, जयकर यादव, उत्तम पवार, संभाजी साळुंखे, चंद्रकांत पाटील, सर्जेराव माळी, डी. टी. कुमार, भिमराव पाटील, विकास यादव, नंदकुमार साबळे, सुभाष यादव, वैभव लिंबारे आदींनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.