Breaking News

गोकुलचंद सानंदा यांचा खामगांव रत्न पुरस्काराने सन्मान


खामगांव,(प्रतिनिधी): खामगांव प्रेस क्लबच्या वतीने दिल्या जाणारा प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘खामगांव रत्न’ पुरस्कार यंदा खामगांव शहरातील प्रसिध्द उद्योजक, सामाजिक, क्रिडा व धार्मिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देणारे समाजभूषण गोकुलचंद सानंदा यांना प्रदान करण्यात आला. याच कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट पत्रकारीतेकरीता दिला जाणारा कै.बाळासाहेब बिन्नीवाले पत्रकारिता पुरस्कार खबरे शामतकचे संपादक अशोक जसवाणी यांना पुरस्कार देउन गौरविण्यात आले. 

पत्रकार दिनी 6 जानेवारी रोजी स्थानिक पत्रकार भवनामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खामगांव प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष किशोर भोसले तर प्रमुख उपस्थिती मध्ये जागृती आणि तपोवन आश्रमाचे मठाधिपती ह.भ.प. श्री शंकरजी महाराज पेसोडे, अति. जिल्हा पोलीस अधिक्षक श्यामराव घुगे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, भारिप बमसंचे प्रदेशाध्यक्ष अशोकभाउ सोनोने, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त वीरप्रताप बाबुजी थानवी, प्रेस क्लबचे सचिव ईश्‍वरसिंह ठाकुर, द्वारकादास जसवानी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. ह.भ.प. शंकरजी महाराज पेसोडे यांनी आपल्या भाषणातून खामगांव प्रेस क्लबच्या या उपक्रमाचे अभिनंदन केले. प्रत्येकाच्या चांगल्या कार्याचा सन्मान हा झालाच पाहिजे त्यामुळे मनोबल वाढते व समाजाचे भले होते असे त्यांनी सांगीतले. राणा गोकुलसिंहजी सानंदा यांना खामगांव रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन त्यांना उत्तम आरोग्य लाभो व त्यांचे हातून उत्तरोत्तर समाज कार्य घडत राहो अशी सदिच्छा व्यक्त केली. यावेळी अति. जिल्हा पोलीस अधिक्षक श्यामराव घुगे यांनी आपल्या भाषणातून सांगीतले की, पत्रकार हे त्यांचे काम अगदी चोखपणे बजावतात. तळागाळातील लोकांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी व त्यांच्या समस्या पुढे आणण्यासाठी दैनंदिनपणे आपली लेखणी झिजवत राहतात.लोकशाहीचा चैथा स्तंभ जेवढे निर्भिडपणे काम करेल तेवढा आपला देश लोकशाहीप्रधान बनेल असे त्यांनी सांगीतले. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, बाबांचे संघटन कौषल्य फार उत्कृष्ट आहे. सन 1965 पासून बाबांनी राष्ट्रीय व राज्यस्तरावरील सामने घेऊन अनेक कुस्तीपटू व कबड्डीपटू घडविले. त्यांच्यामुळेच बुलडाणा जिल्ह्याला कुस्ती व कबड्डी खेळाच्या माध्यमातून सुवर्णमय इतिहास लाभला आहे. गणेशोत्सव व शिवजयंतीच्या माध्यमातून खामगांव शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सार्वजनिक उत्सव साजरे करणार्‍या मंडळांना व प्रशासनाला कर्तव्यबुध्दीतून सहकार्य केले. अशोकभाऊ सोनोने यांनी शून्यातून विश्‍व निर्माण करणार्‍या गोकुलसिंहजी सानंदा यांची खामगांवरत्न पुरस्कारासाठी तसेच कै. बिन्नीवाले पुरस्कारासाठी पत्रकार अशोक जसवाणी या योग्य व्यक्तीची निवड केल्याबद्दल खामगांव प्रेस क्लबचे आभार मानले व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मातृभूमीचे पत्रकार प्रशांत देशमुख यांना केले. संचालन अनिल गवई तर आभार प्रदर्शन सचिव ईश्‍वर ठाकुर यांनी मानले.