Breaking News

अग्रलेख-रणरागिनींची कैफियतपंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार परदेशी जात असतात. तेथील नेत्यांना भेटत असतात; परंतु देशातील अनेक समाजघटक असे आहेत, की ज्यांना मोदी यांनी आपली भेट घ्यावी, आपल्या व्यथा जाणून घ्याव्यात असे वाटते. ॠमन की बात मधून आपल्याशी संवाद साधावा, असे वाटते; परंतु मोदी यांच्याकडून ही अपेक्षा पूर्ण होत नाही. शेतकरी, जवान आणि अनुसंधानाची भाषा एकीकडे केली जात असताना दुसरीकडे या घटकांना खरेच न्याय दिला जातो, की तोंडदेखलेपणा केला जातो, हे एकदा तपासण्याची आवश्यकता आहे. दिल्लीला भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात मोदी यांनी डॉ. स्वामिनाथन समितीच्या शिफारशींनुसार शेतीमालाला भाव दिला जात असल्याचे धादांत खोटे विधान केले. मोदी सरकारने शेतीमालाला स्वामिनाथन समितीच्या शिफारशीप्रमाणे भाव देता येणार नाही, असे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले होते, हे विशेष! डॉ स्वामिनाथन समितीच्या शिफारशीनुसार शेतक-यांना भाव मिळत असला, तर शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्याच नसत्या. कांदा, टोमॅटो, फुले, फळे रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आलीच नसती. यवतमाळ येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या पत्नीने जे भाषण केले, त्यात त्यांनी आपल्या पतीच्या आत्महत्येला व्यवस्थाच जबाबदार असल्याचे म्हटले. शेतक-यांच्या महिलांचे विधवापण हे नैसर्गिक नसून ते परिस्थितीने लादलेले असल्याचे नमूद केले. ही परिस्थिती सरकारी धोरणातील सुसंगतीअभावी आली आहे. असे असले, तरी पदरी असलेल्या मुलांना सोबत घेऊन ही लढाई लढण्याचा त्यांचा निर्धार महत्त्वाचा आहे. दिल्लीत गेलेल्या शेतक-यांच्या मोर्चाच्या वेळी महिला शेतक-यांनी पंतप्रधानांनी शेतक-यांचे दुःख समजावून घ्यावे, त्याच्या बांधावरच्या समस्या जाणून घ्याव्यात, असे म्हटले होते. एकूणच या रणरागिनींनी मोदी यांनाच थेट आवाहन केले होते. शेतक-यांच्या मोर्चाला सामोरे जाण्याचे कुणीच धाडस केले नाही. पाच राज्यांतील निवडणुकांतील निकालामुळे आता शेतक-यांसाठी तीस हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करण्याची शक्यता व्यक्त होत असली, तरी या रणरागिनी त्यावर समाधान मानतील का, हा खरा प्रश्‍न आहे.


दिल्लीचे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ गेल्या दोन-तीन वर्षांपासून शैक्षणिक उपक्रमा्ंशिवाय अन्य विषयांनीच जास्त गाजते आहे. कन्हैयाकुमार याला देशद्रोही ठरविण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही त्यात यश आलेले नाही. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला जेएनयूवर झेंडा फडकावता आलेला नाही. जेएनयूच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कायम चर्चेत असते. डाव्या विचाराचे विद्यार्थी येथे घडतात, असा कायम आरोप केला जातो. दिल्ली विद्यापीठात गोंधळ, दंगली होतात. या विद्यापीठातून गायब झालेल्या मुलाचा शोध लागलेला नाही. त्यामुळे त्याच्या आईसह आणखी एका महिलेने मुंबईत येऊन थेट मोदी यांनाच आव्हान दिले. ’माझा संघर्ष माझा मुलगा नजीबसाठी तर आहेच, मात्र ज्यांच्यावर अन्याय, अत्याचार होत आहेत, अशा देशभरातील विद्यार्थ्यांसाठी मी लढत आहे’, असे सांगत, जो पर्यंत अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी लढतच राहणार आणि या सरकारने हे लक्षात ठेवावे, की जोपर्यंत माझा मुलगा मला परत मिळत नाही, मला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही,’ असा इशारा बेपत्ता झालेला जेएनयूचा विद्यार्थी नजीब खान याची आई फातिमा नफीस यांनी मोदी सरकारला दिला आहे. फातिमा नफीस यांनी फक्त स्वतः पुरते न पाहता अशा अन्यायग्रस्त मुलांची आई होऊन लढण्याचा केलेला निर्धार महत्त्वाचा आहे. मुंबईतील ’हज हाऊस’ येथे सिव्हिल सोसायटीतर्फे आयोजित ’नफरत के खिलाफ, हम सब की आवाज’ या परिसंवादात फातिमा यांनी आपल्या मनातील व्यथा बोलून दाखविली. जमावानं हत्या केलेल्या जुनैद या युवकाची आई सायरा यांनीही केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. पोटचा गोळा गेल्याचे या महिलांचे दुःख मोठे असते. त्यांचे आसू पुसायला सरकारमधील कोणी गेले नाही, ही व्यथा त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचताना फातिमा नफिस यांनी मोदी यांना जाब विचारला. जगभरात वेगवेगळ्या लोकांना भेटत फिरणा-या मोदी यांनी कधी आपल्या देशातील एखाद्या अन्यायग्रस्त आईची भेट घेतली का?, तीन तलाक विषयात न्याय देण्याची भाषा करणा-या मोदी यांनी ज्यांची मुले हिसकावून घेतली गेली, अशा आईची कधी भेट घेतली आहे का? त्यांच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला का?, असे निरुत्तर करणारे सवाल केले. 

प्रत्येक विषयाचे राजकारण करणा-यांना मातांच्या व्यथा समजणार नाहीत. या गोष्टीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्नही केला जाईल. रोहित वेमुलाची आई, असो, की नजीबची; व्यथांना जात नसते, धर्म नसतो. मुलांना गमावून बसलेल्या मातांची आर्त हाक ऐकली जात नसेल, तर त्यांचा संताप व्यक्त होणारच. गुजरातमधील तीन बनावट चकमकीत पुरावे मिळाले नाहीत, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला. न्यायालये पुराव्यावर चालतात; परंतु तपासी यंत्रणा पुराव्यात छेडछाड करीत असतील, साक्षीदार फुटत असतील, तर सामन्यांचा अशा वेळी न्यायव्यवस्थेवरचा विश्‍वासही उडतो. आताही मोदी यांच्यावरचा राग व्यक्त करताना महिलांनी न्यायव्यवस्थेवरही टीका केली. ती अवमान असू शकेल; परंतु गेलेली मुले परत मिळू शकणार नसल्याने त्या अवमानाचे काय करायचे, असा प्रश्‍न एखाद्या आईलाच पडू शकतो मोदी यांची ढोंगी, ’जुमलेबाज’ अशी संभावना करताना ’आम्ही यांच्याकडून एकेक गोष्टीचा हिशेब घेऊ हे त्यांनी लक्षात ठेवावे’, असा इशारा दिला. हा संतापाचा उद्रेक आहे. त्यांच्यामागे कुणी राजकीय संघटना असली, तरी तिला या गोष्टींचे भांडवल करण्याची संधी व्यवस्थेनेच दिली. तिथे मोदी असते काय किंवा अन्य कुणी; संतापाची तीव्रता तशीच असती. पंतप्रधानांचे नाव न घेता त्या पुढे म्हणाल्या, ’ ते ’जालिम’ आहेत, कमजोर लोकांवर अत्याचार करतात आणि नंतर त्याची चेष्टा करतात. ही आमची चेष्टा नाही तर काय आहे? आजपर्यंत यावर का कुणी प्रतिक्रिया दिली नाही? एरव्ही ते प्रत्येक गोष्टीवर ट्विट करत असतात. नजीबबाबत ते काही का बोलत नाहीत? एका आईचा सामना करण्याची त्यांना भीती वाटतेा का, असा सवाल फातिमा नफीस यांनी केला. ’आमची लढाई ही आमच्या हक्कासाठी आहे, सत्यासाठी आहे. देश आणि जगभरातील युवक आमच्या सोबत आहेत आणि या लोकसभा निवडणुकीत हाच युवा वर्ग ही सत्ता उलथवून टाकेल,’ असा इशारा फातिमा देतात, तेव्हा त्यांची उद्विगनता लक्षात घेतली पाहिजे. देशातील परिस्थिती कधी नव्हे इतकी नाजूक झाली आहे. माझा जीव वाचला पाहिजे, असे प्रत्येकाला वाटते; मात्र सर्वांनी एकत्र येत अन्यायाविरुद्ध एकजुटीने लढल्याशिवाय काहीच होणार नाही, अशा शब्दांत जुनैदची आई सायरा यांनी उपस्थितांना कळकळीचे आवाहन केलं. सर्वांनी मिळून आवाज उठवला, तर अत्याचार करणारांचा पराभव होईल, असा विश्‍वासही त्यांनी या वेळी बोलून दाखवला. गेल्या वर्षी रमजान महिन्यात ईदची खरेदी करून घरी परतत असताना 17 वर्षीय जुनैदची जमावाने चालत्या ट्रेनमध्ये हत्या केली होती. 

’पोलिसांनीही आम्हाला मदत केली नाही, आणि न्यायालयातही आम्हाला न्याय मिळालेला नाही,’ असे सांगत जुनैदच्या आईने सरकार, पोलिस प्रशासन आणि न्यायपालिकेवर आपला राग व्यक्त केला. पोलिस आणि प्रशासन अन्यायग्रस्तांना त्रास देत असून गुन्हेगारांना मात्र पाठिशी घालत आहे, असा थेट आरोप सायरा यांनी या वेळी केला. त्याअगोर रोहित वेमुलाच्या आईने ही अशीच सरकारविरोधात लढाई पुकारली होती.