Breaking News

महाराष्ट्र बँकेची दशमेशनगर शाखा बंद करू नका - खातेदार


श्रीरामपूर/प्रतिनिधी 
दशमेश नगर भागातील बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा 14 जानेवारी पासून बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. सदरची शाखा शिवाजी रोडवरील जुन्या शाखेत विलीन करण्यात येणार आहे. मात्र यामुळे या भागातील हजारो खातेदारांची गैरसोय होणार आहे. मुळात महाराष्ट्र बँकेची शिवाजी रोड वरील जुनी शाखा तोट्यात असल्याने ती बंद करण्याऐवजी भरपूर नफ्यात असलेली दशमेश नगर शाखा बंद करण्यात येणार आहे. 

या शाखेत रेल्वे अलीकडील सर्व भागातील नागरिकांचे आर्थिक व्यवहार होतात कॉलेज परिसर, गोंधवणी रोड, गोंधवणी गाव, वार्ड नंबर 1 व 2, मिल्लत नगर या सर्व भागातील सुमारे 60 हजार लोक या बँकेचे खातेदार आहेत. शिवाय या परिसरातील जवळपास दहा हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती खाते या बँकेत आहे. बँकेत कार्यरत सध्याच्या स्टाफने आपल्या सेवेतून जनतेची मने जिंकून जास्तीत जास्त खातेदार बँकेत केले आहेत. महिला वर्गाची लक्षणीय संख्या यात आहे. ही शाखा शिवाजी रोडवर गिरमे चौकात स्थलांतरित झाल्यास या संपूर्ण भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. दोन्ही शाखांचा विचार केला तर बँकेच्या दशमेश नगर शाखेचा व्यवसाय हा जुन्या शाखेपेक्षा शंभर कोटींनी जादा आहे. असे असताना ही शाखा बंद करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असून याबाबत बँक व्यवस्थापनाने सर्वांगीण विचार करून जुनी शाखा हीच दशमेशनगर शाखेत विलीन करावी. येथील जागा जुन्या शाखेपेक्षा अधिक मोठी आहे, तसेच ग्राहकांना मिळणारी सेवा देखील समाधानकारक आहे, म्हणून महाराष्ट्र बँकेच्या वरिष्ठ कार्यालयाने या सर्व बाबींची दखल घेऊन दशमेश नगर शाखा स्थलांतरित करू नये व येथील जनतेची गैरसोय करू नयेे. अशी मागणी सलीमखान पठाण, रियाज पठाण, भाऊ नागरे, अमोल खैरनार, जयेश सोनवणे, सुलेमान शेख, सतीश गांगुर्डे आदींसह या बँकेच्या सर्व खातेदारांनी केली आहे.