Breaking News

समाज सुधारण्यासाठी सावित्रीबाईंचे आयुष्य खर्ची : संतोष पवारजामखेड ता. प्रतिनिधी  : आधुनिक युगात स्त्री पुरूषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात मोलाची कामगिरी करत आहेत. भारतीय स्त्रियांना देखील स्वातंत्र्य मिळवून देण्यात सावित्रीबाई फुले यांचा सिंहाचा वाटा आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्यासोबत शिक्षण प्रसाराचे आणि समाज सुधारण्याचे काम करण्यात आपले आयुष्य सावित्रीबाई फुले यांनी खर्ची केले, असे मत 
संतोष पवार यांनी व्यक्त केले. जिव्हाळा फाऊंडेशन जामखेड च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव कार्यक्रम शहरातील कन्या विद्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी जिव्हाळा फाऊंडेशन चे अध्यक्ष संतोष पवार हे बोलत होते. 
विद्यालयात घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभही यावेळी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, स्कुल कमिटीचे अध्यक्ष प्रा. मधुकर आबा राळेभात, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल अण्णा राऊत, विश्‍वदर्शन केबल चे संचालक गुलाब जांभळे, नगरसेवक डिगाबंर चव्हाण, हरीभाऊ आजबे, शहाजी डोके, काकासाहेब नेटके, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, शहाजी इंगळे, रंगनाथ राळेभात, अवदुत पवार, अमित जाधव, उद्धव भोंडवे, नवनाथ जाधव, ताहेर खान, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. के. डी. चौधरी, पर्यवेक्षक आय एम वाळुंजकर, दिलीप ढवळे, सुनिल वारे, सह अनेक मान्यवर उपस्थित होते.  
पुढे बोलताना पवार म्हणाले की, महाराष्ट्रात महिलांनी देशासाठी लढून मोठी क्रांती केली आहे. याचे उदाहरण द्यायचे झाले तर आपल्या जामखेडच्या भूमीत जन्म घेतलेल्या अहिल्यादेवी होळकर यांचे आहे. अहिल्यादेवी व सावित्रीबाई यांचा आदर्श आजच्या मुलींनी घ्यायला हवा. कारण त्यांनी बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुली केली आहेत. समाजात काम करत असतांना प्रत्येकाने पैशा पेक्षा समाजसेवेला महत्त्व दिले पाहिजे. कारण मानवता हाच खरा धर्म आहे. यावेळी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिंनीनी लेक वाचवा लेक शिकवा हे पथनाट्य सादर केले. या पथनाट्याने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी शाळेचे पालक उद्धव भोंडवे यांनी शाळेसाठी मोफत बारा खुर्च्या भेट दिल्या. तर काकासाहेब नेटके यांनी इन्व्हर्टर भेट दिले. तर शेतकरी मार्केट चे संचालक संतोष पवार यांनी आनखी मुलींना बसण्यासाठी मोफत चटई देण्याचे जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सरसमकर सर यांनी केले.