Breaking News

सरकारला रस्ता दाखविण्याची आलीय वेळ


पाटण (प्रतिनिधी) : आपल्या प्रलंबित 12 मागण्यांसाठी सर्व 10 केंद्रीय कामगार संघटनांनी दोन दिवसीय औद्योगिक भारत बंदची हाक दिली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्र राज्य कामगार संघटना कृती समितीच्या वतीने आज मुंबईत आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात सर्वच कामगार संघटनांच्या नेत्यांनी गेले साडेतीन वर्षे कामगार,शेतमजूर आणि असंघटीत कामगारांचे शोषण करणार्‍या सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. सर्वच कामगारनेत्यांनी आपल्या संतप्त भाषणात सरकारला रस्ता दाखविण्याचा इशारा दिला आहे.

या आंदोलनाचे यजमानपद भुषविणारे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते म्हणाले, मुंबईतील चालू गिरण्या बंद ठेवून, कामगारांनी सरकारच्या धोरणांचा निषेध केला. हे सरकार भांडवलदारांची पाठराखण करुन कष्टकरी कामगारांना बेकारीच्या खाईत लोटत आहे. तेव्हा कामगारांनी पुन्हा क्रांती करण्याची वेळ आली आहे. सीआयटीयूचे विवेक माँटेसा, एआयटीयूसीचे एम. ए. पाटील, महाराष्ट्र इंटकचे अनिल गणाचार्य, आयटकचे कृष्णा भोईर, सीटूचे मिलिंद रानडे, एचएमएसचे शंकर साळवी, पोर्ट ट्रस्टचे सुधाकर अपराध, कॉ. ए. एन. पाटील, संजय वढावकर, जे. आर. भोसले. सुशिला कांबळे, निवृत्ती देसाई, बजरंग चव्हाण, मारुती विश्‍वासराव आदी कामगार नेत्यांनी आपल्या भाषणात सरकारने चुकीच्या कामगार धोरणातून देशातील कामगारांचे खच्चीकरण केल्याचा आरोप केला.

संपूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत हा संघर्ष चालू राहील. आज बेस्टच्या जवळपास 40 हजार कामगारांनी संप करून या आंदोलनाचा श्रीगणेशा केल्याचे कामगारनेते विश्‍वास उटगी यांनी या वेळी सांगितले. 

दरम्यान, माजी राज्यमंत्री कामगार नेते सचिनभाऊ अहिर यांनीही या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला असून या संपात ईंटक, एआयटीयूसी, सीटू, एचएमएस, एआयसीसीटीयू, आयपीएफ सेवा, एआययूटीयूसी, एनटीयूआय, रेल्वे, बँका, विमा, पोर्ट ट्रस्ट, कोळसा, तेल, वायू, सार्वजनिक उद्योग, कारखाने, ट्रान्सपोर्ट, बेस्ट, एसटी, टॅक्सी, ओला, उबर, अंगणवाडी, आशा सेविका आदी कर्मचारी, फेरीवाले तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांनी उत्सफूर्त सहभाग घेतला आहे.