Breaking News

एऩआयचे उत्तर प्रदेशात पाच ठिकाणी छापे


अमरोह : राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) सोमवारी मध्यरात्री उत्तर प्रदेशमधील अमरोहामध्ये छापेमारी करण्यात आली. दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या दोन संशयितांच्या चौकशीसाठी पाच ठिकाणी छापे टाकण्यात आले. एनआयएसोबत उत्तर प्रदेश एटीएसचे पथक होते. या दोन संशयितांना मागील आठवड्यात एनआयएकडून अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. 


एनआयएने 26 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेश आणि दिल्लीत 17 ठिकाणी छापे टाकून घातपाताचा मोठा कट उधळला होता. या छाप्यात इसिसच्या 10 संशयितांना अटक करण्यात आली होती. या कारवाईत मोठ्या प्रमाणात स्फोटके, शस्त्रास्त्रे, देशी बनावटीची रॉकेट लाँचर जप्त करण्यात आली आहेत. तसेच 7.5 लाख रोख रक्कम, सुमारे 100 मोबाईल्स, 135 सीम कार्ड्स, लॅपटॉप्स आणि मेमरीकार्ड देखील हस्तगत केली आहेत. धक्कादायक म्हणजे या कारवाईतून दहशतवादी संघटना इसिसच्या ’हरकत उल हर्ब ए इस्लाम’ या नवीन गटाचा गौप्यस्फोट झाला आहे. 

इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या कारणांवरून अटक झालेल्या संशयितांच्या चौकशीनंतर एनआयए आणि एटीएसने सोमवारी मध्यरात्री छापे टाकले. या छाप्यात संशयितांच्या घरी चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीनंतर आणखी काही संशयितांना ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.