वायद्याची शेती फायद्याची करणार; साहित्यमेळ्यात आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या पत्नीचा जागर


यवतमाळ/ प्रतिनिधी (संत तुकडोबा महाराज नगरीतून)-92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याची विधवा पत्नी वैशाली येडे यांच्या हस्ते झाले. एखाद्या शेतकरी महिलेला सारस्वतांच्य दरबारात हा मान प्रथमच मिळाला. साहित्य संमेलन ज्या यवतमाळ जिल्ह्यात भरले आहे, त्याच जिल्ह्यात शेतकर्‍याच्या सर्वांधिक आत्महत्या होतात. पुढच्या जन्मी अदानी, अंबानी होईन असे वाटून पतीने आत्महत्या केली. मी हीच वायद्याची शेती माझ्या हिमतीवर फायद्याची करून दाखवणार हा विश्‍वास आहे. या व्यवस्थेने माझ्या पतीचा बळी घेतला. जगरहाटीने विधवापण लादले, अशी टीका त्यांनी केली; परंतु त्यांनी दाखविलेला आत्मविश्‍वास सारस्वतांनाही भावला. 

यंदा संमेलनात प्रथमच संविधानाची प्रत ठेवण्यात आली आहे. सुरुवातीला आयोजक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांचे भाषण झाले. यवतमाळ संमेलनाला राज्य शासनाकडून 50 लाख रुपये निधी मिळाला आहे. याआधी संमेलनाला 25 लाख मिळत होता, असे डॉ. कोलते यांनी सांगितले. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांंनी ग्रंथ प्रदर्शनास भेट दिली. तत्पूर्वी, सकाळी दहाच्या सुमारास निघालेल्या ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनातील कार्यक्रमांना सुरुवात झाली. यवतमाळच्या नागरिकांनी मोठ्या उत्साहात ग्रंथदिंडीत सहभाग नोंदवला. यवतमाळचे रस्ते हा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दीने फुलले होते. शुक्रवारी सकाळी येरावार चौक येथून सुरू झालेल्या ग्रंथदिंडीने 92 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची अनौपचारिक सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारा सोहळा या संपूर्ण ग्रंथ दिंडीच्या मिरवणुकीत पाहायला मिळाला. गेले 8 दिवस वादाचे सावट होते, तरी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितले.


ग्रंथदिंडी मध्ये ग्रंथाच्या पालखीसह विविध संत दर्शन देखावे, जन्मशताब्दी वर्ष असणारे पु.ल. देशपांडे, ग.दि. माडगूळकर यांच्या जीवन दर्शनावरील देखावे, लेंगीनृत्य, गोंडीनृत्य, कोलामीनृत्य अशा विविध लोक संस्कृतींची झलक पाहायला मिळाली. तसेच पोलिस बँड, शिवसमर्थ ढोल समर्थपथक अशा समूहाचे सादरीकरणही झाले. ग्रंथदिंडीत मावळते संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, स्वागताध्यक्ष मदन येरावार, कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते, नगराध्यक्ष कांचनताई चौधरी आदी सहभागी झाले होते. देशमुख यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. आझाद मैदान येथून निघालेली ग्रंथदिंडी पाच कंदील चौक, तहसील चौक, गोधनी रोड, राजन्ना बिल्डींग, अणे महिला महाविद्यालय, दत्त चौक, बस स्थानक चौक, गार्डन रोड, एलआयसी. चौक, पोस्टल ग्राऊंड या मार्गाने संमेलनस्थळी पोहोचली.


संमेलनाच्या इतिहासात प्रथमच ’प्रभारी अध्यक्ष’ महामंडळाचे प्रतिनिधित्व करतील. श्रीपाद जोशी यांच्या राजीनाम्यामुळे उपाध्यक्ष विद्या देवधर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी महामंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री संमेलनाला उपस्थित नव्हते. त्याऐवजी तावडे उपस्थित होते. उद्या किंवा रविवारी मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अशी माहिती पालकमंत्री आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष मदन येरावार यांनी दिली.

शेतकरी आत्महत्यांचा लढा तेवत

शेतकरी पतीच्या आत्महत्यानंतर हालअपेष्टा सहन करून त्याच्याशी निर्धाराने लढा देत वैशाली सध्या सन्मानाने जगत आहेत. विशेष म्हणजे, ’तेरवं’ या शेतकरी विधवांच्या लढ्याची कहाणी असलेल्या नाटकात भूमिका साकारून त्यांनी या प्रश्‍नाला तेवत ठेवले आहे.

कार्यक्रमांचे नियोजन बिघडले

निमंत्रित वक्ते, कवी, लेखकांनी बहिष्कार असलेल्या कार्यक्रमांचे, टॉक शोचे, मुलाखतींचे, व सत्काराचे नियोजन अखेर बिघडले. आता मान्यवरांचा सत्कार, टॉक शो, प्रकट मुलाखत होणार नाही. विद्या बाळ यांचा सत्कार, प्रभा गणोरकर यांची मुलाखत होणार नाही. ’माध्यमांची स्वायत्तता नेमकी कुणाची?’ हा टॉक शो रद्द करण्यात आला. त्याचे कारण त्यावर संबंधितांनी बहिष्कार टाकला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget