Breaking News

सांडी तू अवगुणू रे भ्रमरा...
एन्ट्रोः संस्काराचा वारसा असल्याचा गवगवा करणा-या पक्षातले लोकच जेव्हा संस्कारहीन भाष्य करतात, तेव्हा त्यांना खरंच संस्कारी म्हणायचं का, असा प्रश्‍न पडतो. महिलांना एकीकडं देवीचं स्थान द्यायचं आणि दुसरीकडं त्यांच्या चारित्र्यावर संशय घेणारी वक्तव्यं करायची, असा प्रकार भाजपच्या नेत्यांकडून वारंवार होतो आहे. इतर पक्षांचे नेतेही त्याला अपवाद नाही; परंतु ‘पार्टी वुईथ डिफरन्स’ अशी ओळख असलेल्या पक्षाचे नेते खरंच इतरांपेक्षा वाईट अर्थानं वेगळं वागू लागतात, तेव्हा संत तुकारामांच्या भाषेत ‘ऐशा नरा मोजून माराव्या पैजारा’ असं म्हटलं तर वावगं होत नाही.
.
बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार सुरेश धस हे कायम वादात असतात. त्यांचा धसमुसळेपणा सर्वांना चांगला माहीत आहे. शेतक-यांना कर्ज मिळत नाही, म्हणून स्टेट बँकेत धुडगूस घातल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. त्यांनी बँकेत तोडफोड केली होती. अधिका-यांना मारहाण केली होती. आता तर त्यांनी थेट त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रशांत परिचारक यांच्यासारखं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. परिचारक यांनी पंजाबमधील सैनिकांबद्दल वक्तव्य केलं होतं. ते जरी एका समुदायाशी संबंधित असलं, तरी लष्करी जवानांचा आणि त्यांच्या पत्नींचा अवमान करणारं होतं. त्यासाठी त्यांना विधान परिषदेतून दीड वर्षे निलंबित व्हावं लागलं होतं. आता विधान परिषेचेच सदस्य असलेल्या सुरेश धस यांनी बिहारी लोक राहतात इथं आणि त्यांना तिकडं मुलं होतात, असं वक्तव्य केलं आहे. हा तमाम बिहारी महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याचा प्रकार आहे. संस्कार हे मोठ्यांपासून खालपर झिरपत येत असतात. जिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांविषयी अवमानजनक भाषा वापरतात, तिथं त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी तशी भाषा वापरली, तर त्यांना दोष कसा देता येईल? पाच राज्यांच्या निवडणुकीतील प्रचाराच्या वेळी राजस्थानमध्ये बोलताना मोदी यांनी सोनिया गांधी यांचा उल्लेख ’काँग्रेस की विधवा’ असा केला होता. महिला नेत्यांवर पुरुष नेत्यांनी अशा प्रकारे टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशा टीका करणारे नेते हे कोणत्याही एका पक्षाचे नाहीत, कोणातच पक्ष याला अपवाद नाही, असं चित्र आहे.
जयपूर येथील प्रचारसभेमध्ये बोलताना मोदी यांनी हे वक्तव्य केलं होतं. मोदी म्हणाले होते, आपल्या देशात काँग्रेसने असे सरकार चालवले, जेथे जन्म न झालेली मुलगी विधवाही झाली आणि तिला विधवा पेन्शनही सुरू झाली. हे रुपये कोणती विधवा घेत होती? काँग्रेसची अशी कोणती विधवा होती, जिच्या खात्यामध्ये हे रुपये जात होते?’’ पंतप्रधानांचा बोलण्याचा रोख सोनिया गांधी यांच्याकडं होता.
राजस्थानात निवडणुकीत प्रचारसभेत बोलताना माजी केंद्रीय मंत्री आणि लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्यावर टिप्पणी केली होती. वसुंधरांना आराम द्या, त्या खूप थकल्या आहेत. खूप जाड झाल्या आहेत. आधी बारीक होत्या, असं ते म्हणाले होते. हा केवळ विनोद होता, असा खुलासा यादव यांनी केला; पण वसुंधरा राजे यांनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या विधानामुळं आपण अपमानित झालो आहोत, असं त्या म्हणाल्या होत्या. अशी वक्तव्यं करण्याची शरद यादव यांची पहिलीच वेळ नाही. 1997साली संसदेमध्ये महिला आरक्षण विधेयकावर झालेल्या चर्चेत बोलताना त्यांनी शहरी महिलांचा उल्लेख परकटी (केस कापलेल्या) महिला असा केला होता. परकटी शहरी महिला ग्रामीण महिलांचे कसे प्रतिनिधित्व करतील, असं विधान यादव त्यांनी केलं होतं. 2017मध्येही त्यांनी असंच वक्तव्य केलं होतं. मताची अब्रू तुमच्या मुलीच्या अब्रूपेक्षा अधिक असते. जर तुमच्या मुलीची अब्रू गेली, तर फक्त गाव आणि गल्लीची अब्रू जाईल; मात्र एकदा मत विकलं गेलं तर देश आणि प्रांताची अब्रू जाईल, असं ते म्हणाले होते.


2012 मध्ये मोदी यांनी राजकीय प्रचारसभेला संबोधित करताना शशी थरूर यांच्या दिवंगत पत्नी सुनंदा यांच्याबाबत, ’वाह! काय गर्लफ्रेंड आहे? तुम्ही कधी पन्नास कोटींची गर्लफ्रेंड पाहिली आहे का?’ असं वक्तव्य केलं होतं. त्यावर शशी थरूर यांनी ट्वीटरवर उत्तरही दिलं होतं. मोदीजी, माझी पत्नी 50 कोटींची नाही, तर अनमोल आहे; पण तुम्हाला हे समजणार नाही. कारण तुम्ही कोणाच्या प्रेमास लायक नाही, असं उत्तर थरूर यांनी दिलं होतं. 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर महिलांनी मोठ्या संख्येनं एकत्र येऊन निषेध व्यक्त केला होता; मात्र त्यावरही टीकाटिप्पणी झाल्या होत्या. पश्‍चिम बंगालमधील जांगीपूर येथील काँग्रेसचे खासदार असणार्‍या अभिजीत मुखर्जी यांनी, दिल्लीमधील 23 वर्षीय युवतीवर झालेल्या बलात्काराविरोधात निषेध मोर्चात सहभागी होणार्‍या ’सजूनधजून’ येणार्‍या महिलांना प्रत्यक्ष स्थितीची काहीच कल्पना नाही. हातात मेणबत्ती घेऊन रस्त्यावर येणं फॅशन झालं आहे. या सजूनधजून आलेल्या महिला आधी डिस्कोथेकमध्ये गेल्या आणि त्यानंतर सामूहिक बलात्काराला विरोध करण्यासाठी इंडिया गेटवर पोहोचल्या, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. मुखर्जी यांनी नंतर माफी मागितली होती. मोदी गेल्या वर्षी संसदेत ’आधार’बद्दल बोलत होते, त्या वेळी खासदार रेणुका चौधरी जोरजोरात हसू लागल्या. त्या वेळेस चौधरींना अडवणार्‍या सभापतींना उद्देशून मोदी म्हणाले होते, सभापतीजी रेणुकाजींना आपण काहीही म्हणू नका. रामायण मालिकेनंतर अशा प्रकारचं हसू ऐकण्याचं सौभाग्य आज मिळालं आहे. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर करून रेणुका चौधरी यांच्या हास्याची तुलना रामायणातील शूर्पणखेशी केली. तसंच भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी रामायणातील शूर्पणखेचं नाक कापण्याचं दृश्यही ट्विटरवर शेअर केलं होतं.
भाजपचे नेते नरेश अग्रवाल यांनी अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांच्याबद्दल ’सिनेमात नाचणारी’ असे शब्द वापरले होते. या टिप्पणीच्यावेळी अग्रवाल यांच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ समाप्त होताना आणि समाजवादी पक्षाने जया बच्चन यांना पुन्हा एकदा राज्यसभेसाठी उमेदवारी दिली होती. 2012साली गुजरात निवडणुकांच्या निकालावेळी टीव्हीवर चाललेल्या चर्चेमध्ये काँग्रेस खासदार संजय निरुपम यांनी स्मृती इराणी यांच्याबाबत अशीच टिप्पणी केली होती. कालपर्यंत तुम्ही पैशांसाठी ठुमके लावत होत्या आणि आज तुम्ही राजकारण शिकवत आहात, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. महिलांबाबत अशी विधानं दुसर्‍या देशांमध्ये केली जात नाहीत असं नाही. 2017मध्ये ब्रिटनमधील राजकीय नेत्यामुळं मोठा वाद निर्माण झाला होता. एका गरोदर राजकीय नेत्याबाबत बोलताना या नेत्यानं आक्षेपार्ह विधान केलं होतं. ती गरोदर आहे, तिचा सगळा वेळ नॅपी बदलण्यातच जाईल, ती सामान्य माणसाचे प्रश्‍न कसे सोडवेल? असं ते वक्तव्य होतं. त्यानंतर त्या राजकीय नेत्यास माफी मागावी लागली होती. ब्रिटनसारख्या अनेक देशांमध्ये अशा विधानांवर संबधित व्यक्तींवर कारवाई झाल्याची उदाहरण आहेत. संसदेतील एका सदस्यानं महिला कमजोर, लहान आणि कमी बुद्धिमान असतात त्यामुळं त्यांना कमी पैसे दिले पाहिजेत असं विधान केलं होतं. त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आलं आणि त्याचा भत्ताही बंद करण्यात आला.
आपल्याकडं मात्र जवान तसंच त्यांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणा-याचं निलंबन रद्द केलं जातं. अन्य कोणत्याही नेत्यावर साधी कारवाई होत नाही. आ. राम कदम यांच्यासारखा बेजबाबदार नेता युवतींचं अपहरण करण्याची भाषा करतो, तरी त्याच्यावर कारवाई करण्याचं धाडस दाखविलं जात नाही. भाजपचे वरिष्ठ नेते एस.व्ही शेखर यांनी फेसबुक पोस्टवर महिला पत्रकारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. ‘मदुरई युनिव्हर्सिटी, गव्हर्नर अ‍ॅण्ड द वर्जिन चिक्स ऑफ ए गर्ल’, असं शीर्षक या पोस्टला त्यांनी दिलं. ’कुणीही महिला मोठ्या व्यक्तीबरोबर झोपल्या शिवाय वृत्त निवेदक किंवा रिपोर्टर बनू शकत नाही’, असं शेखर यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं. भाजप नेत्याच्या या आक्षेपार्ह पोस्टमुळं चेन्नईतील पत्रकारांनी त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली होती.