Breaking News

येणार्‍या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा-खा. राजीव सातव
खामगांव,(प्रतिनिधी): मागील 2014 ला सत्तेत येण्यासाठी भाजपाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. रोजगाराचे फसवे आश्‍वासन दिले. अनेक चुकीच्या बाबी मांडल्या. आता पाच वर्षे पुर्ण होत आली तरीही दिलेल्या आश्‍वासनांबाबत भाजप गंभीर नाही. साडेचार वर्षात प्रत्येक वर्गाचा भाजपाकडुन अपेक्षाभंग झाला आहे. सर्व सामान्य माणसाचा विकास खुंटला आहे. 

तरुण,शेतकरी, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी 2019 च्या निवडणुकीत देशात व राज्यात काँग्रेसच सरकार आणण्याचा कटीबध्द व्हा असे आवाहन अ. भा. काँग्रेस कमिटीचे सचिव तथा खासदार राजीव सातव यांनी केले. युवक काँग्रेसच्या वतीने युवा शक्तीच्या हक्कासाठी आणि भाजपा सरकारच्या निषेधार्थ कन्याकुमारी ते कश्मीर पर्यंत युवा क्रांती यात्रा सुरु आहे. या यात्रेचे 9 जानेवारी रोजी खामगांव शहरात आगमन झाले. यावेळी गांधी चौकात त्यांची जाहीर सभा झाली.

 या कार्यक्रमाला अ.भा.युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद, आमदार हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीनिवासजी, महाराष्ट्राच्या प्रभारी प्रतिभाताई रघुवंशी, सह प्रभारी मनिष चौधरी, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे, धीरज देशमुख, आमदार राहुल बोंद्रे, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार अमित झनक, ओमी यादव, हेमंत ओगले, राहुल राव, स्वातीताई वाकेकर, यांची उपस्थिती होती. खासदार राजीव सातव म्हणाले की, राज्यातील भाजप-सेनेची सरकार छत्रपतींचे नाव घेउन फसवी कर्जमाफी जाहिर केली, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक,छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बांधण्याची नुसत्या घोषणा केल्या. प्रत्यक्षात एकही घोषणा पुर्ण केली नाही.

बुलडाणा जिल्हा हा मातृतिर्थ माँ जिजाऊंचा जिल्हा आहे. हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणुन ओळखला जातो. बुलडाणा जिल्हयातील नेत्यांनी नेहमीच काँग्रेसची ताकद वाढवुन काँग्रेसला उर्जा देण्याचे काम केले आहे. देश पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता या जिल्हयातील काँग्रेस नेत्यांमध्ये आहे. हीच ताकद आणि उर्जा घेउन मागील निवडणुकीत झालेली चुक सुधारुन बुलडाणा जिल्हयातुन काँग्रेसचा खासदार लोकसभेत व जिल्हयातील जास्तीत जास्त आमदार विधानसभेत पाठवुन राहुलजींचे हात बळकट करा असे त्यांनी सांगीतले. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव यांनी आपल्या भाषणातुन भाजपच्या विरोधातील रोष व्यक्त करण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने युवा क्रांती यात्रा सुरु आहे. नुसती हवाबाजी करुन भुलथापा देणारा मोदी सारखा खोटारडा पंतप्रधान आपण आजपर्यंत पाहिला नसल्याचे ते म्हणाले.

 गुजरात दंगलीनंतर जातीयवादी राजकारण करुन खोटी आश्‍वासने देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देशातील संवैधानीक संस्था बदनाम करण्याचे काम सुरु केल्याचा आरोप त्यांनी केला. देशाचा संविधान,लोकतंत्र,अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. 2 कोटी रोजगाराचा नारा देऊन सुशिक्षीत तरुणांची फसवणुक केली. सोबतच शेतकरी आणि सर्वसामान्यांचा विश्‍वासघात केला. हे सर्व बदलण्यासाठी राहुल गांधींच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. य.काँ.चे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीनिवासन यांनी आपल्या भाषणात सांगितले की,भाजप, आरएसएसच्या मंडळींनी अगोदर इंग्रजाची मुखबिरी केली तर आता धनदांडग्या उद्योगपतींसाठी काम करीत आहे. आरएसएस ड्रेसकोड बदलला पण त्यांची देशविभाजनाची मानसिकता कधीही बदलु शकत नाही.अनेक गंभीर प्रश्‍नांवर पंतप्रधान संसदेत काहीही बोलत नाही. युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे म्हण्काले की, जनतेने मोदी सरकारला बहुमत देउन सत्तेत पाठविले.परंतू या सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला,युवकांची फसवणुक केली. मुद्रा लोन न मिळाल्यामुळे बुलडाणा जिल्हयातील सुशिक्षीत तरुणाने आत्महत्या केली.मोदींनी अनिल अंबानीला राफेल निर्मितीचे कंत्राट देउन सर्वात मोठा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी आपल्या भाषणात सांगितले की, स्व.विलासराव देशमुख यांचे कार्यकर्त्यांवर प्रचंड प्रेम होते. त्यांचे आशिर्वाद पाठीशी असल्यामुळे 2014 पर्यंत प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला. जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती या सारख्या प्रत्येक संस्थेंवर काँग्रेसचा झेंडा फडकला व खामगांव हे काँग्रेसचा गड म्हणुन ओळखल्या जाउ लागले. काँग्रेसची ताकद एवढी मोठी आहे की, 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदाराला पराभुत करण्यासाठी पंतप्रधान मोदींना खामगांवात यावे लागले असेही ते म्हणाले.