Breaking News

शत्रुघ्न सिन्हांचे थेट मोंदीनाच आव्हान; वाराणसीतून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट


नवी दिल्ली : केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची एकही संधी न सोडणारे शत्रुघ्न सिन्हा यांनी पुनहा एकदा थेट पंतप्रधान मोदी यांना आव्हान दिले आहे. आगामी लोकसभा निवडणूक वाराणसीतून नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढणार असल्याचे शत्रुघ्न सिन्हा यांनी एका कार्यक्रमात सांगितले आहे. त्यामुळे सिन्हा आता अधिकृत बंड करणार का, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

यावेळी त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे. पक्षात आधी लोकशाही होती, पण आता हुकूमशाही आहे असे ते म्हणाले. मी नेहमी खरे बोलतो आणि बोलत राहील असे सांगायलाही सिन्हा विसरले नाहीत. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, की मी पक्षाच्या विरुद्ध कधी बोलत नाही. फक्त पक्षाला आरसा दाखविण्याचे काम करतो. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची स्तुतीही केली. ते म्हणाले, की फार कमी वेळेत गांधींमध्ये परिपक्वता आली आहे. इतर पक्षांच्या अध्यक्षांनी त्यांच्याकडून हे शिकायला हवे. ते पुढे म्हणाले, की मी नेहमीच गांधी कुटुंबाचा चाहता राहिलो आहे. जवाहरलाल नेहरूंपासून सोनिया गांधींपर्यंतचा मी प्रशंसक आहे. आता राहुलचा देखील प्रशंसक आहे असे सांगायलाही ते विसरले नाहीत. आगामी निवडणूक वाराणसीमधून लढणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.