Breaking News

युवकाच्या सर्तकतेमुळे बिबट्याला जीवदान


कराड (प्रतिनिधी) : कराड तालुक्यातील खालकरवाडी येथील शिवारातील विहीरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात युवक पांडुरंग गाडे याच्या सजगतेने वनविभाग व ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नांना यश आले आहे. विहीरीत पडल्यानंतर जगण्यासाठी झुंजणार्‍या बिबट्याला तब्बल साडे पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पिंजर्‍यात जेरबंद करून सुरक्षित बाहेर काढण्यात वनविभागाच्या अधिकार्‍यांना यश आले. पकडेल्या बिबट्याला वराडे येथील वनविभागाच्या कार्यालयात ठेवण्यात आले आहे. बिबट्याला सुरक्षित पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. 

गुरुवार, दि. 10 रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास खालकरवाडी येथील पट्टी नावाच्या शिवारात पांडुरंग गाडे शेतीला पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना संजय शिंदे यांच्या विहीरीत मृत्यूशी झुंज देणारा एक बिबट्या आढळून आला. पांडुरंग गाडे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ ही माहिती वनविभागाला कळवली. तासाभरात वनविभागाची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर खालकरवाडी ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याचे रेसक्यू ऑपरेशन सुरू झाले. वनविभागाने दोरीच्या सहाय्याने कॉट व पिंजरा विहिरीत सोडला. त्यानंतर बिबट्याला कॉटवर घेऊन पिंजर्‍यात सोडण्यात आले व त्यानंतर पिंजरा बंद करून बिबट्याला बाहेर काढण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून खालकरवाडी परिसरात नागरिकांना एका बच्छड्यासह एका बिबट्याचे दर्शन होत होते. त्यामुळे नागरिकांच्यात भितीचे वातवरण निर्माण झाले होते. गुरुवारी बिबट्याला विहिरीतून सुरक्षित स्थळी नेल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.