Breaking News

छत्रपती शिवाजी संग्रहालयासाठी तातडीने निधी द्यावा : आ. भोसले


सातारा (प्रतिनिधी): मराठ्यांची राजधानी असलेल्या ऐतिहासिक सातारा शहराला इतिहासकालीन वस्तू आणि वास्तुंचा गौरवशाली वारसा लाभला आहे. सातारा शहरात ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयासाठी जिल्हा क्रीडा संकुलाशेजारील शासकीय जागेत भूईकोट प्रकारातील वास्तू उभारण्याचे काम सुरु आहे. या इमारतीच्या दुसर्‍या टप्प्यातील कामास बांधकाम विभाग आणि पुरातत्व विभागाने तातडीने सुरुवात करावी, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या. दरम्यान, संग्रहालयाच्या तिसर्‍या टप्प्यासाठी सुमारे दोन कोटी 50 लाख रुपये निधीची गरज असून राज्य शासनाने हा निधी तातडीने द्यावा. कोणत्याही परिस्थितीत संग्रहालयाचे काम लवकरात लवकर मार्गी लावले जाईल. प्रसंगी रस्त्यावरही उतरु, असा इशाराही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शासनाला दिला आहे. 

सातारा शहरात छ. शिवाजी संग्रहालय आहे. मात्र या जुन्या इमारतीमध्ये पुरेशा सुविधा नसल्याने आणि इमारत तोकडी असल्याने इतिहासप्रेमींसह जिज्ञासूंची गैरसोय होत असते. त्यामुळे संग्रहालयाच्यानवीन इमारतीला मंजूरी आणि निधी मिळवण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पाठपुरावा करुन हे काम सन 2008 मध्ये मंजूर करुन घेतले होते. पहिल्या टप्प्यातील काम पुर्ण झाले असून इमारतही उभी राहिली पण, पुढील काम निधीअभावी रखडले होते. दुसर्‍या टप्प्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध झाल्यानंतर या टप्प्यातील काम तातडीने सुरु होण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी गुरुवारी दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागात जावून आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम यांच्यासह बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एल. एन. वाघमोडे, उपअभियंता आर. टी. अहिरे, मोहसीन मोदी, शाखा अभियंता रवी आंबेकर, दिग्विजय वंजारी, शिवाजी संग्रहालयाचे अभिरक्षक श्री. सुर्वे यांच्यासह संग्रहालयाचे काम करणारे ठेकेदारही उपस्थित होते. 
काम मंजूर झाल्यानंतर संग्रहालयाचे काम तीन टप्प्यात करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. पहिल्या टप्प्यातील इमारत उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी शासनाने उपलब्ध करुन दिलेला 8 कोटी 37 लाख निधी खर्च झाला आहे. दरम्यान, दुसर्‍या टप्प्यातील कामांसाठी 5 कोटी 20 लाख 44 हजार 951 रुपये निधी नोहेंबर 2017 मध्ये मंजूर करुन घेतला होता. हा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून इमारतीच्या आतील फर्निचर, अंतर्गत सजावट यासह संग्रहालय परिसरात बाग बगीचा निर्माण करणे आणि संग्रहालय परिसरात उपहारगृह, विश्राम गृह, तिकीट बुथ, स्वच्छतागृह, वाहन पार्किंग, संरक्षक भिंत आणि अंतर्गत रस्ते तयार करण्याचे काम केले जाणार आहे. निधी उपलब्ध झाला असून टप्पा क्र. 2 मधील कामांना तातडीने सुरुवात करण्याच्या सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुरातत्व विभागाला दिल्या असून कामाला तातडीने सुरुवात करण्यात येईल, असे उपस्थित अधिकार्‍यांनी सांगितले.