Breaking News

भाजपाला पाठींबा देऊ नका असे मी जगतापांना सांगितले होते - कळमकर

 
नगर/प्रतिनिधी
नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला पाठिंबा देण्यासाठी स्थानिक पातळीवर निर्णय घेतला, ही आघाडी अभद्र आहे, अशी टीका करत मी या प्रक्रियेत नसताना, माझ्याच पक्षातील काही पदाधिकारी माझ्या नावाची बदनामी करत आहेत. जर हिंमत असेल तर त्यांनी ग्रामदैवत विशाल गणपतीसमोर येऊन तसे जाहीर करावे. असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. दादाभाऊ कळमकर यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केले. भाजपाचे आ. शिवाजीराव कर्डिले यांनी मंत्री गिरीश महाजन यांना आपल्याकडे आणून अडचणीत आणले. अशी घणाघाती टिकाही त्यांनी यावेळी केली आहे.

भाजपला पाठिंबा दिल्याचे पाप माझे आहे की तुमचे हे संपूर्ण शहराला माहीत आहे. भाजपला पाठिंब्याच्या प्रक्रियेत माझा काहीही संबंध नाही. तरीसुध्दा भाजपचे मंत्री गिरीश महाजन, आ.शिवाजी कर्डिले यांच्यासोबतचा माझा फोटो सोशल मिडियावर व्हायरल करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीतीलच काही स्थानिक नेत्यांनी केला असुन भाजपाला पाठींबा देऊ नका असे आपण आ. जगताप यांना सांगितले होते. मुळात भाजपला राष्ट्रवादीने दिलेल्या पाठिंब्याचे पाप माझे आहे की तुमचे, हे खरे-खोटे करायची माझी तयारी आहे. जे मला बदनाम करताहेत त्यांनी शहराचे ग्रामदैवत विशाल गणपतीच्या मंदिरात येऊन देवासमोर हात ठेवून खरे-खोटे करावे असे आवाहनही कळमकर यांनी केले आहे. यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना कळमकर म्हणाले की, महापौर निवडीच्यावेळी महानगरपालिकेमध्ये भाजपबरोबर केलेली आघाडी अभद्र असून वास्तविक पाहता भाजपाला पाठिंबा देऊ नये अशी स्पष्ट भूमिका असताना स्थानिक पातळीवरच्या पदाधिकार्‍यांनी हा निर्णय घेतला व त्यांनी हे कृत्य केले आहे. मी त्यांच्यासमवेत नव्हतो मी फक्त तीन बैठकांना उपस्थित होतो. या तीन बैठका पक्षाच्या होत्या, पण यामध्ये मी स्पष्टपणे भाजपाला पाठिंबा देऊ नका असे सांगितले होते, मात्र राष्ट्रवादीचे आ. अरुण जगताप यांच्याशी आपले दोन वेळा बोलणे झाले होते. मात्र ज्या वेळेला निर्णय घ्यायचा होता त्यावेळेला मला अंधारात ठेवले गेले व यांनी परस्पर निर्णय घेतला कारण त्यांना त्यांच्या समवेत जायचे होते. असे यावरून आता सिद्ध झाले आहे. मी गेल्या चाळीस वर्षांपासून पवार यांच्या बरोबर काम करत आहे. पक्षाच्या विविध पदांवर मी काम केले आहे. या ठिकाणी आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप यांना सुद्धा मी पक्षात आणलेलं आहे. तसेच अनेक पदाधिकारी सुद्धा पक्षांमध्ये मी आणले आहेत. शहर जिल्हाध्यक्षपद सुद्धा मीच घेऊन दिले आहे. त्यामुळे मी माझे काम केलेले आहे, मात्र राजकीय सोयीसाठी कोण काय करत असेल त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही असे त्यांनी स्पष्ट केले.


 माझे चरित्रहनन करण्याचे काम त्या नेत्यांचे
महापौर निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्याबाबत मला बदनाम व माझे चरित्रहनन करण्याचे काम राष्ट्रवादीमधील त्यांचे ते हितचिंतंक करत असल्याचा आरोप कळमकर यांनी केला. अनिल राठोड, खा. दिलीप गांधी अभय आगरकर यांच्यासह काँग्रेसचे नेते माझ्याविरोधात ब्र शब्द काढत नाहीत, तर त्यांचे आणि मैत्रीचे संबंध असल्याचे कळमकर यांनी सांगितले.


 ते तर कर्डिलेंचे षड्यंत्र ! 
जलसपंदामंत्री गिरीष महाजन यांना आ. शिवाजी कर्डिले यांनी माझ्या घरी आणले. महाजन माझ्याघरी आले तो एक अपघात होता. असे सांगून कळमकर यांनी कर्डिले यांनीच बुके आणला व मला दिले. हा कर्डिलेंचा डाव होता. तसेच त्यांनीच राजकीय हेतूने मला अडचणीत आणले ते षडयंत्र कर्डिलेचे होते. असा आरोप करत त्यांनी या षडयंत्रामध्ये कोण कोण होते हे मला माहित नाही हे सुध्दा कळमकर यांनी स्पष्ट केले.

नगरसेवकांच्या विरोधात ठोस पाऊल उचलावेच लागेल

राष्ट्रवादीने भाजपला दिलेल्या पाठिंब्याबाबत राष्ट्रवादीच्या वरिष्ठांमध्ये नाराजीचा सूर आहे. ज्येष्ठनेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीतही याबाबत चर्चा झाली आहे. हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले असून नगरसेवकांच्या विरोधात ठोस पाऊल पक्ष उचलले असे मला वाटत असल्याचे दादाभाऊ कळमकरांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.