Breaking News

दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा समारोप

 

बुलडाणा,(प्रतिनिधी): उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय  महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व जिल्हा  ग्रंथालय संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा ग्रंथोतसवाचा 29  डिसेंबर रोजी समारोप करण्यात आला. जिल्ह्यात कार्यरत शासकीय ग्रंथालयांना  अधिक उभारी देण्यासह वाचन चळवळ सक्षम करण्याचा संकल्प सर्व ग्रंथालय  कार्यकर्त्यांनी यावेळी घेतला. 

पहिल्या सत्रात्र वाचन संस्कृती व आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर चर्चा  सत्र पार पडले. त्यानंतर दुसर्‍या सत्रात जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तुंचा  इतिहास या विषयावर चित्रफितीद्वारे सादरीकरण करण्यात आले. या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध हृृदयरोगतज्ञ डॉ. दिपक लद्धड  होते. यावेळी विवेक चांदुरकर यांनी जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक वास्तुंचे  महत्व आणि सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक वास्तुंची  चित्रफित दाखवून त्या बाबतचा इतिहास चांदुरकर यांनी सविस्तरपणे मांडला. 

यावेळी बोलताना डॉ. दिपक  लद्धड यांनी जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक  पार्श्‍वभूमी आहे. ऐतिहासिक वास्तुंचे आपण जतन केले पाहिजे परंतु  दुर्दैवाने या ऐतिहासिक वास्तुंबाबत नागरिक जागरुन नसल्याची खंत यावेळी  त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर तिसर्‍या सत्रात कि.वा. वाघ यांच्या  अध्यक्षतेखाली वाचन चळवळ काल, आज आणि उद्या या विषयावर चर्चा सत्र पार  पडले. यावेळी नेमीनाथ सातपुते, प्रा. कमलेश खिल्लारे, निशिकांत ढवळे, डॉ.  गणगे, रफिक कुरेशी, सुरेखा हिस्सल यांनी चर्चेत सहभाग घेत वाचन चळवळीचे  बदलते स्वरुप आणि अडचणी याबाबत साधकबाधक चर्चा केली. या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन महेंद्र बोर्डे यांनी केले. जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने  अध्यक्ष सुनील वायाळ व पदाधिकार्‍यांनी ग्रंथोत्सवाच्या उत्कृष्ट नियोजन  आणि आयोजनाबाबत जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतीश जाधव यांचा सत्कार केला.  त्यानंतर या जिल्हा ग्रंथोत्सवाचा समारोप करण्यात आला.