Breaking News

कोटेश्‍वर पुलाचे काम रखडल्याने नागरीक त्रस्त


सातारा (प्रतिनिधी) : सातारा शहर आणि शाहूपुरीला जोडणार्या कोटेश्‍वर पुलाचे काम अत्यंत रटाळपणे सुरू असल्याने नागरिकांना व वाहनचालकांना अक्षरश: प्रदक्षिणा घालण्याची वेळ येवून ठेपली आहे. धिम्या गतीमुळे पुलाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या व्यापार्‍यांवर परिणाम होत असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याने पुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सातारा शहर आणि शाहूपुरीला जोडणार्‍या श्रीकोटेश्‍वर पुलाची दुरावस्था झाल्याने सातारा पालिकेने नवीन पुलासाठी एक कोटी 21 लाख 57 हजार रुपयांची तरतूद करून 11 सप्टेंबर 2018 रोजी नवीन पुलाच्या कामास प्रारंभ केला. त्यामुळे सुरूवातीला वाहतुकीचा काहीसा खोळंबा झाला. शाहूपुरीकडे जाण्यासाठी अनंत इंग्लिश स्कूल किंवा दैनिक ऐक्य कॉर्नरपासून ओढ्यातून पुढे आणि संत गजानन महाराज मंदिराच्या पाठीमागून अशा तीन पर्यायी मार्गांचा अवलंब करत वळसा घालण्याची वेळ नागरिकांसह वाहनचालकांवर येवून ठेपली आहे.
या पुलाचे काम सुरू करण्यापूर्वीच येथील पाण्याच्या पाईपलाईन शिफ्ट करणे आवश्यक होते. मात्र, रस्त्याचे काम सुरू केल्यानंतर काम बंद ठेवून पाण्याच्या लाइन शिफ्ट करण्याचे काम हाती घेण्यात आले. 

रटाळ कामामुळे पुलाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत नगरपालिकेच्या बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता पुलाचे काम करताना पाइपलाइन फुटल्याने कामाला उशीर होत आहे, पूल आणि त्यावरील रस्त्याचे काम 26 जानेवारीपर्यंत पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. बांधकाम सभापती मनोज शेंडे म्हणाले, यापूर्वी 20 फुटांचा पूल होता. त्यामुळे एकाच वेळी दोन वाहने जाण्यास अडचणी निर्माण होत होत्या. नवीन पूल हा 40 फुटांचा करण्यात आला असून त्यावर दुतर्फा 5 फुटांचे दोन फूटपाथ बांधण्यात येणार आहेत. पुलाची उंची 1 मीटरने वाढवण्यात आली आहे.