Breaking News

कास्ट्राईबने केले नुतन वर्षाचे प्रारंभ रिमांडहोमच्या वंचित मुलांसमवेत

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने नुतन वर्षाचे प्रारंभ रिमांडहोम मधील वंचित मुलांसमवेत करण्यात आले. राज्याध्यक्ष एन.एम. पवळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले. 

जि.प. मैल कामगार संघटनेचे बाजीराव गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली हा सामाजिक उपक्रम पार पडला. यावेळी राज्य सचिव निवृत्ती आरु, जिल्हा कार्याध्यक्ष वसंतराव थोरात, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता रणसिंग, गुलाबराव जावळे, महिला जिल्हाध्यक्षा नंदा भिंगारदिवे, सुरवी हॉस्पिटलचे संचालक डॉ.अमित पवळे, रंगनाथ गावडे, इंजी.शिवराम चितळकर, डी.एल. खांडेकर, मायाताई जाधव आदि कास्ट्राईबचे पदाधिकारी, रिमांडहोम मधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
प्रास्ताविकात निवृत्ती आरु यांनी दरवर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाचे प्रारंभ कास्ट्राईब संघटना रिमांडहोम मधील मुलांपासून करत असल्याची माहिती दिली. यावेळी कास्ट्राईबचे राज्याध्यक्ष एन.एम. पवळे व रिमांडहोम मधील एका मुलाचा वाढदिवस एकत्रित साजरा करण्यात आला. एन.एम. पवळे म्हणाले की, वंचितांसमवेत वाढदिवस, सण व उत्सव साजरा केल्याने खरा आनंद व समाधान मिळतो. सेलिब्रेशन करण्याची पध्दत बदलत चालली असून, उपेक्षितांना केलेली मदत हेच जीवनातील समाधानाचे सेलिब्रेशन असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.