Breaking News

राफेलबाबत संरक्षणमंत्री खोटारड्या राहुल गांधी यांचा आरोप; मोदी बोलायला घाबरत असल्याची टीका

Image result for राहुल गांधी


नवीदिल्लीः राफेल प्रकरणावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर हल्लाबोल केला. देशाच्या संरक्षणमंत्री संसदेत राफेल कराराबाबत धादांत खोटे बोलत आहेत, असा आरोप राहुल यांनी केला आहे. राफेलबाबत मोदी बोलायला का घाबरतायत, असा सवाल त्यांनी केला.

’एचएएल’सोबत राफेलसाठी झालेल्या करारावर राहुल यांनी प्रश्‍न उपस्थित केले होते. राहुल यांच्या प्रश्‍नांना उत्तर देताना सीतारामन यांनी ’2014 ते 2018 या कालावधीत एचएएलसोबत 26 हजार कोटीं रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या करारावर स्वाक्षरी झाली असून आणखी 73 हजार कोटींचा करार होणे अपेक्षित आहे’ असे संसदेत स्पष्ट केले होते.

सीतारामन यांचे हे विधान साफ खोटे असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. ’एचएएल’ला सरकारकडून 1 लाख कोटी रुपये दिल्याचे सीतारामन यांनी संसदेत सांगितले होते; पण आज सीतारामन यांनी 26 हजार 570 कोटी रुपये दिल्याचे सांगितले. त्या वारंवार खोटे बोलत आहेत. मी विचारलेल्या प्रश्‍नांवर त्या संसदेत केवळ ड्रामा करत आहेत. माझ्या प्रश्‍नांवर हो किंवा नाही असे थेट उत्तर त्या देऊ शकल्या नाहीत. राफेल करारावर संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते की नाही? याचे थेट उत्तर पंतप्रधान मोदी आणि सीतारामन यांनी द्यावे, अशी मागणी राहुल यांनी केली. देशाच्या संरक्षणमंत्री लोकसभेत मंत्रालयाच्या प्रवक्त्या असल्यासारखे बोलत आहेत, अशी टीकाही राहुल यांनी केली आहे.