Breaking News

राहाण्यासाठी लागणार्‍या जागा खरेदीची परवानगी द्या- सरोदे


नेवासे फाटा/प्रतिनिधी
राहण्यासाठी ग्रामीण भागामध्ये शेतातील जागा खरेदीची परवानगी देण्यात यावी. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप सरोदे यांनी केली आहे. नेवासे येथे पंचायत राज समिती तपासणीसाठी आली होती. त्यामध्ये वरील मागणी दिलीप सरोदे यांनी समितीतील सदस्यांपुढे वस्तुस्थिती मांडल्यानंतर त्यांनी याबाबत योग्य ती भूमिका घेऊ अशी ग्वाही दिली होती. यासंदर्भात विभागामार्फत चौकशी सुरु झाली असल्याची माहिती दिलीपराव सरोदे यांनी दिली.

याबाबत त्यांनी पंचायत राज समितीला दिलेल्या निवेदनात ग्रामीण भागात गावठाणात जागा शिल्लक नाही. तसेच दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्याने कुटुंबातील संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात रहाण्याचा मोठा बिकट प्रश्‍न निर्माण झाला असल्याने शेतातील जागा खरेदीसाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली होती. शासनाचा इंग्रज राजवटीतील जुना नियम जमिनीचे तुकडे पाडू नये, तुकडे जोड तुकडे बंदी कायदा असल्याने 20 गुंठ्याच्या आत खरेदी होत नाही. या जाचक कायद्यामुळे ग्रामीण भागातील वस्त्या वाढत असतांना जवळजवळ 90 टक्के लोक शेतात रहातात. रहाण्यासाठी लोक महसुली रक्कम भरण्यासाठी तयार आहेत. परंतु कायद्याच्या जुनाट जाचक अटीमुळे गुंठेवारीची खरेदी होत नाही. पंचायत राज समिती समोर दिलीपराव सरोदे यांनी केलेल्या मागणी चौकशी सुरू झाली आहे. याबाबत शेतीसाठी जागा खरेदीसाठी परवानगी देण्यात यावी. अशी मागणी ही सरोदे यांनी महसूल विभागाच्या प्रधान सचिवाकडे निवेदनाद्वारे केली आहे. यामुळे लोकांच्या रहाण्याचा व जागेचा प्रश्‍न सुटणार असल्याने यामध्ये समाजहिताची भूमिका सरकारने व महसूल प्रशासनाने घ्यावी. असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.