Breaking News

सहगलांचे निमंत्रण रद्द करण्यासाठी भाजपचाच दबाव; साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा आरोप


यवतमाळ /प्रतिनिधीः प्रत्येक वक्त्याने साहित्य संमेल्लनात बोलताना निमंत्रण वापसीवरून साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद जोशी यांना लक्ष्य केले; परंतु तीन दिवस कुणावरही आरोप न करता शांत राहिलेल्या डॉ. जोशी यांनी स्वागताध्यक्षांना लक्ष्य केले. नयनतारा सहगल यांचे निमंत्रण मागे घेतले नाही, तर संमेलनाच्या आर्थिक नाड्या आवळल्या जातील, या शब्दांत स्वागताध्यक्षांच्या प्रतिनिधींनी दबाव आणला, असे जोशी यांनी म्हटले आहे.नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण वापसीमागे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत, असा थेट प्रहार डॉ. जोशी यांनी केला. संमेलनाच्या आयोजकांनी डॉ. जोशी यांच्या निर्देशांनुसार सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्याचे उघडपणे सांगितले होते. आयोजन समितीतील सदस्यांनीही पत्रकार परिषदेत जोशी यांच्यावर थेट आरोप केले होते. या आरोपांनंतर राज्यभरातून जोशी यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले. डाव्या चळवळीने त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यातही उभे केले. परिणामी कुणीही जबाबदार असले, तरीही नैतिक जबाबदारी घ्यायला तयार आहे, असे सांगून डॉ. जोशी यांनी महामंडळ अध्यक्षपदाचा राजीनामा दिला; पण त्यामुळे प्रकरण अधिकच चिघळले आणि त्याचे संपूर्ण पडसाद 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यावर उमटले.
आयोजकांना धमकी देऊन आपल्याला नको असलेली व्यक्ती संमेलनाच्या व्यासपीठापासून दूर ठेवण्यात आली. कुटिल कारस्थान रचून याचा मागमूसही लागू दिला नाही आणि संपूर्ण प्रकरणाची खापर महामंडळाच्या अध्यक्षांवर फोडले, ही लाजीरवाणी घटना आहे, असेही जोशी म्हणाले. मुख्य म्हणजे सहगल प्ररकरणात अद्याप आरोप-प्रत्यारोपच सुरू असल्यामुळे नेमके कोण जबाबदार आहे, याचे गूढ कायम आहे. स्वागताध्यक्ष मदन येरीवार हे मंत्री असून ते भाजपचेच आहेत. त्यामुळे जोशी यांचा आरोप हा थेट भाजपलाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करीत आहे.