Breaking News

वर्तमानपत्राच्या स्वातंत्र्याला महत्व देणे गरजेचे : आ. जयंत पाटील; खंडाळ्यात पत्रकारदिन उत्साहात


खंडाळा (प्रतिनिधी) : लोकशाहीत सर्वच पक्षांचे ऑडिट करण्याचे काम पत्रकरांचे आहे. देशात लोकशाही टिकवण्याच काम पत्रकारांचेच आहे. त्यासाठी वर्तमानपत्राच्या स्वातंत्र्याला महत्व देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात राहून पत्रकारीतेचा वसा जपणे तसे जिकीरीचे काम आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच पत्रकारांचे संरक्षण टिकण्यासाठीच्या तरतूदीचा समावेश आमच्या जाहीरनाम्यात समावेश राहील, असे मत माजी राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

येथील पंचायत समितीच्या किसन वीर स्मारक सभागृहात पत्रकार दिन आणि जिल्हास्तरीय आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. त्यावेळी आ. पाटील बोलत होते. या कार्यक्रमात आदर्श पत्रकार म्हणून महाबळेश्‍वर येथील सचिन शिर्के यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

कार्यक्रमास आमदार मकरंद पाटील, महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख, भाजपचे नेते पुरूषोत्तम जाधव, पत्रकार हरिष पाटणे, सत्कारमूर्ती सचिन शिर्के, बाजार समितीचे सभापती राजेंद्र तांबे, जिल्हा परिषद सदस्य उदय कबुले, दीपाली साळुंखे, सभापती मकरंद मोटे, उपसभापती वंदना धायगुडे, पंचायत समिती सदस्या अश्‍विनी पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तानाना ढमाळ, माजी सभापती विनोद क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुरुषोत्तम जाधव म्हणाले, पत्रकार संघाकडून विधायक काम करणार्‍यांचा सन्मान केला जातो.दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबविताना समाज प्रबोधन करतात, ही गौरवास्पद बाब आहे.
आ. मकरंद पाटील म्हणाले, पिढ्यान पिढ्या दुष्काळी असलेला खंडाळा तालुका आता दुष्काळातून बाहेर आलाय. शेतीला पाणी आले. तर दुसरीकडे औद्योगिकीकरण वाढीस लागू लागले आहे. भविष्यात हा तालुका श्रीमंत म्हणून पुढे आल्याशिवाय राहणार नाही. तालुक्यातील पत्रकार विविध प्रश्‍नांना वाचा फोडून विकासात्मक दृष्टीकोन ठेवतात, ही बाब अभिमानास्पद आहे. 

हरिष पाटणे म्हणाले, माध्यमांवर हल्ले होत आहेत, मात्र पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होत नाही. अशा परिस्थितीत खंडाळ्यात चांगली पत्रकारिता रूजली असून भविष्यात माध्यमांना नक्कीच चांगले दिवस माध्यमांना येतील.