Breaking News

बँकेच्या पोटनियमात बदल करुन शेतकर्‍यांना कर्ज-भंडारीराहाता/प्रतिनिधी
नाशिक मर्चंट को ऑफ बँकेच्या पोटनियमात बदल करुन शेतकर्‍यांना यापुढे कर्ज पुरवठा करण्याचा बँकेचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी केले. देशात नागरी सहकारी बँकामध्ये दोन नंबरवर असलेल्या नाशिक मर्चंटस को.ऑप बँकेच्या संचालकपदाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सोहनलाल मदनलाल भंडारी तसेच संचालक अरुण मनोत, हरिष लोढा यांचा माजी नगराध्यक्ष डॉ.के.वाय.गाडेकर यांच्या निवासस्थानी डॉ.के.वाय.गाडेकर दांपत्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी भाजपाचे डॉ. राजेंद्र पिपाडा नगरसेविका मंगलाताई गाडेकर, सुरेश जेजूरकर, बन्सीलाल कुंभकर्ण, सुरेश गाडेकर, डॉ. गाडेकर धन्वंतरी पतसंस्थेचे व्यवस्थापक अरुण मेहेत्रे, धन्वंतरी महिला पतसंस्थेचे व्यवस्थापक संतोष माळवदे आदी मान्यवर उपस्थित होते.


बँकेचे अध्यक्ष भंडारी म्हणाले की, नाशिक मर्चंट बँकेवर सुमारे 4.5 वर्षे प्रशासक होते. या काळात मोठा गौरव्यवहार झाला होता. परंतू बँकेची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने बँकेच्या कारभारावर फारसा परिणाम झाला नाही. नुकत्याच बँकेच्या संचालकपदाच्या झालेल्या निवडणुकीत सभासदांनी आमच्यावर विश्‍वास व्यक्त करुन संपुर्ण पॅनलला निवडुन दिले आहे. आज बँकेचे दोन लाख सभासद आहेत. ठेवीदारांना जास्त व्याज व कर्जदारांना कमीत कमी व्याजदर ठेवण्याचा बँकेचा प्रयत्न राहील. वाढ झालेल्या एन.पी.ए.चे प्रमाण कमी केले जाणार असुन बँकेच्या पोटनियमात दुरुस्ती करुन लवकरच शेतकर्‍यांनाही कर्जपुरवठा करण्यासाठी नाशिक मर्चंट बँक पुढे सरसावणार आहे. बँकेच्या वतीने नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी साडेपाच एकरामध्ये नामको कॅन्सर हॉस्पीटल सुरु करण्यात आले आहे. आजपावेतो साडेपाच हजार केसरी व पिवळे रेशनकार्डधारक कॅन्सर रुग्णांनी या वौद्यकिय सेवेचा लाभ घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जागतिक कासार फाउंडेशनचे पश्‍चिम महाराष्ट्र विभागप्रमुख बन्सीलाल कुंभकर्ण यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व संचालकांचा सत्कार केला.