Breaking News

थोरातांनी ज्ञानाची गंगा खेड्यापाड्यापर्यंत नेण्याचे कार्य केले - खरात


संगमनेर/प्रतिनिधी

संगमनेरच्या उजाड माळरानावर नंदनवन फुलविण्याचे काम स्व. भाऊसाहेब थोरात यांनी केले. थोर स्वातंत्र सेनानी भाऊसाहेब थोरात यांनी दुष्काळी तालुक्यात सहकाराच्या माध्यमातून समृद्धी निर्माण करुन दिली. नव्या पिढीला स्व.भाऊसाहेब थोरातांचे विचार मार्गदर्शक व ऊर्जा देणारे असून स्व.भाऊसाहेब थोरातांनी ज्ञानाची गंगा खेड्यापाड्यापर्यंत नेण्याचे कार्य केले, असे प्रतिपादन आदिवासी जनसेवक प्रा.बाबा खरात यांनी केले आहे.

मा.महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात व आ. डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्व.भाऊसाहेब थोरात यांचे विचार व प्रबोधन जागर रथ यात्रेचे तालुक्यात आयोजन करण्यात आले होते. या रथ यात्रेचा सुकेवाडी येथील शुक्लेश्‍वर महाविद्यालयात समारोप झाला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मणराव कुटे हे होते तर व्यासपीठावर भाऊसाहेब कुटे,सरपंच वैभव सातपुते, खंडू सातपुते, शुक्लेश्‍वर विद्यालयाचे माजी प्राचार्य केधवराव जाधव, पै.तात्याराम कुटे तसेच सुकेवाडी व खांजापूर परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते. यावेळी प्रा. बाबा खरात पुढे बोलताना म्हणाले कि, स्व.भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यसंग्रामात महत्वपुर्ण योगदान दिले. स्वातंत्र्यानंतर सहकारातून अमृत उद्योग समूहाची निर्मीती करुन येथील जनतेच्या जीवनात खर्‍या अर्थाने स्थर्य निर्माण केले. संपुर्ण जीवनभर तालुक्याच्या विकासाचा ध्यास घेतला. आर्थिक शिस्त, काटकसर, पारदर्शकता, दुरदृष्टी ही विकासाची चतुसुत्री संपुर्ण देशाला दिली. साहित्य, सहकार, शेती, पर्यावरण, जलसंधारण अशा वेगवेगळ्याा क्षेत्रात भरीव कार्य केलेले स्व. भाऊसाहेब थोरात यांनी ग्लोबल वार्मिंगचा धोका टाळण्यासाठी दुरदृष्टीतून दंडकारण्य चळवळ सुरु केली. आ. बाळासाहेब थोरात व आ. डॉ.सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली विविध संस्थांनी दंडकारण्य अभियानांतर्गत तालुक्यात विविध झाडांचे, बियांचे रोपन केले आहे. येथील सहकार हा राज्यात आदर्शवत असून एक नवा मापदंड निर्माण केला आहे. झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा हा कार्यक्रम लोकसहभागातून राबविला पाहिजे. स्व.भाऊसाहेब थोरात हे व्यक्ती नसून एक विचार आहे. या विचाराचा सर्वत्र जागर व्हावा म्हणून या प्रबोधन दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.