Breaking News

स्थापत्य अभियंत्यांचा पुण्यात मोर्चा; कनिष्ठ अभियंतापदासाठी जुनाट नियम; नोकरीची संधी डावलल्याचा आरोपपुणे/ प्रतिनिधीः 
राज्य शासनाने सुरू केलेल्या मेगा भरतीत सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, जलसंधारण विभागाच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब या पदाचा समावेश आहे. या तीन ही विभागातील रिक्त पदांची भरती शासनाकडून करण्यात येणार आहे; परंतु या भरतीत शासनाने 1970 साली तयार केलेल्या जुनाट नियमांनुसार कनिष्ठ अभियंता पदासाठी फक्त पदविकाधारक उमेदवारांनाच अर्ज करता येणार आहेत. अशा जुनाट नियंमामुळे उच्चशिक्षित पदवीधारकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे या नियमात बदल करावा, यासाठी स्थापत्य अभियंता विद्यार्थ्यांनी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा महामोर्चा काढला. 

शासनाकडून करण्यात येणार्‍या कनिष्ठ अभियंता या संवर्गातील सार्वजनिक बांधकाम (405 पदे), जलसंपदा (1470 पदे), जलसंधारण (282पदे) अशा एकुण 2157 पदांची भरती करण्यात येणार आहे; परंतु या भरतीत केवळ पदविकाधारकांनाच संधी देण्यात येणार आहे. यासंदर्भात चेतन डोईजोडे म्हणाले, की कनिष्ठ अभियंता पदावर भरती करताना, नवीन नियमावली ठरविण्यासाठी व कालबाह्य झालेल्या अभियांत्रिकी सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यासाठी 2006 मध्ये राज्य शासनाने सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समीतीने सर्व मान्यताप्राप्त अभियांत्रिकी संघटना, जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी प्रदीर्घ विचार विमर्श करुन राज्यातील अभियांत्रिकी संवर्गात कालसुसंगत बदल करण्यासाठी कालबाह्य झालेल्या अभियांत्रिकी सेवा प्रवेश नियमात सुधारणा आणि महत्वपुर्ण शिफ़ारशींसह आपला अहवाल 2011 मध्ये शासनास सादर केला आहे; मात्र अद्याप अहवालातील शिफ़ारशी लागू केल्या नाहीत. परिणामी सध्या 1970 मधील जुन्याच नियंमानुसार भरती केली जात आहे.
यासंदर्भात अनेक तक्रारी केल्यानंतर जलसंपदा विभागाने शिफ़ारशी स्वीकृत करण्यासाठी 26 जून 2018 रोजी ही फ़ाईल मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांकडे दिली आहे; मात्र अद्याप यावर काहीही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, आमच्या हक्कांसाठी आणि रोजगारासाठी महामोर्चा आयोजित केला असल्याचे डोईजोडे याने सांगितले. मोर्चासाठी नागपूर, औरंगाबाद, नाशिक, मुंबई, सोलापूर, तसेच अन्य जिल्ह्यातून पदवीधारक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.