‘पटक देंगे’ विधानावर दानवेंचा ‘यू टर्न’!


कोल्हापूर/ प्रतिनिधीः
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आक्रमक पावित्र्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा ‘पटक देंगे’ हा इशारा शिवसेनेला नव्हे, तर भाजपच्या विरोधात उतरणार्‍या विरोधकांना होता, असे म्हणत भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ‘यू टर्न’ घेतला आहे. 

गेल्या आठवड्यात लातूर येथील एका सभेत शाह यांनी शिवसेनेशी युती झाली नाही तर त्यांना आपटले जाईल, असे सांगताना ‘पटक देंगे’ असा शब्दप्रयोग केला होता. त्याला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘ शिवसेनेला आपटणारा अजून जन्माला यायचा आहे’ असे खरमरीत प्रत्युत्तर कालच्या मुंबईतील सभेत दिले. या पार्श्‍वभूमी शाह यांच्या विधानाकडे लक्ष वेधले असता खा. दानवे यांनी शिवसेनेकडून आलेल्या आक्रमक भूमिकेनंतर पवित्रा बदलला. ‘तो इशारा शिवसेनेला नव्हता, तर भाजपच्या विरोधात उतरणार्‍या विरोधकांना होता’ असे म्हणत ‘यू टर्न’ घेतला.

गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीनिमित्ताने मी राज्यातील मतदार संघाचा आढावा घेत आहे. आतापर्यंत 36 लोकसभा मतदारसंघात दौरा केला आहे. 288 विधानसभा आणि 48 लोकसभा मतदारसंघात एक प्रसारक नेमला आहे. संघटनेच्या बळावर पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी दिसतील, इतकी आमची निवडणूक जिंकण्याची तयारी झाली आहे, असे दानवे म्हणाले. भाजपला हरवण्यासाठी काँग्रेसने राजकारण सुरू केले आहे. काँग्रेसने कितीही आघाड्या केल्या, तरी त्याचा काहीही राजकीय फायदा त्यांना होणार नाही. भाजप संघटनेच्या बळावर निवडणूक जिंकेल. विविध योजना आणून आजवर भाजपने विकास करून क्रांतिकारक बदल केला आहे’असे त्यांनी सांगितले. मतांचे विभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यावे, अशी आमची इच्छा आहे. युतीचा फॉर्म्युला बाळासाहेब ठाकरे असताना ठरला आहे. युतीची चर्चा राज्य पातळीवर व्हावी. जिथे जागांचा प्रश्‍न निर्माण होतो, त्या ठिकाणी केंद्र पातळीवर चर्चा व्हावी,असा तोडगा त्यांनी सुचवला. निवडणुकांच्या जागेसंदर्भांत अद्याप शिवसेनेशी चर्चा झाली नाही; पण युतीबाबत आशावादी आहोत असे दानवे म्हणाले. 

खोतकरांचे आव्हान स्वीकारले


जालना लोकसभा मतदारसंघात मंत्री अर्जुन खोतकर आणि दानवे यांच्यात सुरू असलेल्या वाकयुद्धावरून छेडले असता दानवे यांनी ‘ मीच रिंगणात असणार आहे. आतापर्यंत अनेकजण समोर आले आहेत. कोणीही पुढे आला तरी नीट करू’ असे सांगत त्यांचे आव्हान स्वीकारल्याचे सांगितले. कोल्हापूर ,सातारा मतदारसंघातील उमेदवारीबाबत विचारणा केली असता दानवे यांनी सगळे उमेदवार मार्च महिन्यात जाहीर करण्यात येईल, असे स्पष्टीकरण केले.


पत्रकार परिषद आटोपती 


दानवे यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार होताच त्यांच्यावर पत्रकार परिषद आटोपण्याची वेळ आली. कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या उमेदवारीबाबतच इतर प्रश्‍न पत्रकारांनी विचारले, मात्र त्याला दानवे यांनी बगल दिली. एवढेच काय तर शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवर विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तरही त्यांनी देण्याची टाळले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget