Breaking News

दखल-निमंत्रणवापसीमागंच डोकं !


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्धघाटक म्हणून नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करण्यावरून साहित्य संमेलन व आयोजक संस्थांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न होत होता. श्रीपाद जोशी यांना राजीनामा द्यावा लागला. आता मात्र नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करण्यामागं भाजपच्याच नेत्याचा हात असल्याचा आरोप आता जोशी यांनी केला असल्यामुळं भाजपचं पितळ उघड पडलं आहे. स्वागताध्यक्ष मदन येरीवार यांनी आरोप नाकारले असले, तरी पाणी कुठंतरी मुरतं आहे, हे स्पष्ट आहे.

यवतमाळ इथं झालेल्या साहित्य संमेलनाच्या वादाचं कवित्त्व अद्यापही चालू आहे. साहित्य संमेलनाचा समारोप झाला असला, तरी निमंत्रक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांना दिलेलं निमंत्रण आणि त्यांचं भाषण आल्यानंतर त्यांचं निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला. साहित्य संमेलन हे जरी साहित्यिक विषयासाठी असली, तरी त्यात सध्याच्या घडामोडींचे पडसाद उमटत असतात. सहगल या जरी इंदिरा गांधी यांच्या कुटुंबाशी संबंधित असल्या, तरी त्यांनी इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीविरोधात वक्तव्य केलं होतं. देशात असहिष्णुतेचं वातावरण असताना त्यांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला होता. तेव्हापासून पुरस्कार वापसीचं सत्र सुरू झालं. आताही त्या उद्घाटक म्हणून येणार आणि सध्याच्या सत्ताधा-याविरोधात भाष्य करणार असं जेव्हा लक्षात आलं, तेव्हा त्यांचं निमंत्रणच रद्द करण्यात आलं. कारण मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचा इंग्रजी लेखकाच्या हस्ते उद्घाटन करण्याला असलेला विरोध हे पुढं करण्यात आलं. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. चूक एकाची आणि माफी दुस-यालाच मागावी लागते. तसाच प्रकार साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्याबाबतीत झला. त्यांच्यावरच सर्वांच्या टीकेचा रोख होता. न केलेल्या आरोपाची शिक्षा त्यांना भोगावी लागली. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देताना राज यांचा आदर्श आपण घेतल्याचं नमूद केलं. साहित्य संमेलनातील गोंधळाचा हा ’प्लॉट’ नेमका कुणी रचला, याचा शोध घ्या, असं आवाहनही जोशी यांनी केलं होतं. अगोदर या प्लॉटबद्दल फारसं काहीच न बोलणारे जोशी तीन दिवस गप्प राहिले. साहित्य संमेलनाचं सूप वाजायला एक दिवस उरला असताना त्यांनी भाजपचं पितळ उघडं पाडलं. नयनतारा सहगल यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. काही संघटनांच्या विरोधानंतर हे निमंत्रण मागं घेण्यात आलं. संमेलनाच्या आयोजकांनी या निर्णयासाठी जोशी यांना जबाबदार धरलं होतं, तर महामंडळानं आयोजकांकडं बोट दाखवलं होतं; मात्र जोशी हेच सगळ्यांच्या टीकेचे धनी ठरले होते. 

सुरुवातीला राजीनाम्याबद्दल बोलण्यास नकार देणार्‍या जोशी यांनी नंतर आपली नाराजी बोलून दाखवली. नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनाम्याची प्रेरणा मला राज ठाकरे यांच्याकडून मिळाल्याचं ते म्हणाले. ’हा वाद मनसेच्या एका छोट्या कार्यकर्त्यानं संमेलन उधळण्याची धमकी दिल्यामुळं सुरू झाला होता. त्या कार्यकर्त्याचं कृत्य आपल्या अंगावर घेऊन राज यांनी माफी मागितली. मनाचा मोठेपणा दाखविला. मी देखील तसंच केलं, असं सांगून, दुसर्‍याच्या चुकीची जबाबदारी आपण घेत असल्याचं त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचवलं होतं ’आयोजकांनी मला खलनायक आणि दहशतवादी ठरवलं. हे सगळं अत्यंत वेदनादायी होतं. हे सगळं का झालं याचा शोध घ्या, असं आवाहनही त्यांनी केलं होतं.


सहगल यांनी निमंत्रण नाकारल्यानंतर लगेच भाजपवर टीका केली होती. आयोजकांना आपली भूमिका अगोदरपासून माहिती होती, तरीही निमंत्रण देऊन ते रद्द करण्यामागं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच कारणीभूत आहेत, असा थेट आरोप त्यांनी केला. विरोधकांनीही हाच
आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क अधिका-यानं पत्रक प्रसिद्धीस देऊन साहित्य संमेलनाला फक्त निधी देण्याचं काम राज्य सरकार करतं. संमेलनाचं उद्घाटक म्हणून कुणाला बोलवायचं आणि कुणाला निमंत्रण नाकारायचं, याचे सर्वाधिकार आयोजक आणि साहित्य महामंडळाला असतात, असं जरी मुख्यमंत्री कार्यालयानं म्हटलं असलं, तरी आयोजक संस्था आणि साहित्य महामंडळावर दबाव असल्याशिवाय असं कुणीच करू शकणार नाही, हे स्पष्ट आहे. शालेय शिक्षणमंत्री विनोत तावडे यांनी साहित्य संमेलनात इंग्रजी साहित्यातील ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना न बोलावले गेल्यानं महाराष्ट्राचं नाक कापलं गेल्याचं मत व्यक्त केलं. आक्रमक बोलल्यानं राज्य सरकारच्या दबावाची बाजू झाकोळली जाऊन सरकार दोषमुक्त झालं असं त्यांचं वाटणं त्यांना समाधान देऊन गेलं असेल; पंरतु हे समाधान फार काळ टिकलं नाही. संमेलनाला कुणाला बोलवायचं आणि कुणाला नाही हे सांगणं सरकारचं काम नसतं. नयनतारा सहगल वादाशी सरकारचं काहीही घेणंदेणं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. सहगल वादात मुख्यमंत्र्यांचं नाव गोवलं जाणं गैर आहे. सहगल यांना दिलेलं निमंत्रण मागं घेण्याचा साहित्य महामंडळाचा निर्णय सरकारलाही पटला नाही. या निर्णयामुळं महाराष्ट्राचं नाक कापलं गेलं, अशी तिखट प्रतिक्रिया तावडे यांनी त्यांच्या भाषणात नोंदवली आहे. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी या प्रकाराबद्ल साहित्य महामंडळाला जबाबदार धरलं. साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा ढेरे यांनी सहगल प्रकरणी आयोजकांना धारेवर धरलं. आयोजक संस्था भलेही कोलते यांची असली, तरी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्यातील मंत्री मदन येरावार होते. ते भाजपचे आहेत. त्यामुळं ही टीका अप्रत्यक्ष कुणावर होती, हे समजणं फारसं अवघड नाही. आता तर थेट जोशी यांनीच  मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचं नयनतारा सहगल यांना दिलेलं निमंत्रण मागं घ्यावं, यासाठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि राज्यमंत्री मदन येरावार यांच्या प्रतिनिधींनी दबाव आणला होता, असा थेट आरोप केला. संमेलनाच्या आर्थिक नाडया आवळण्याची धमकीही दिली होती, असा आरोप जोशी यांनी केल्यामुळं
आतापर्यंतची झाकली मूठ उघडली आहे. महामंडळाचे ‘बोलके’ अध्यक्ष प्रखर टीका सहन करूनही गप्प कसे, असा प्रश्‍न साहित्यविश्‍वात विचारला जात असताना अखेर ते बोलले आहेत. स्थानिक माध्यमांना थकव्याचं कारण सांगून प्रतिक्रिया नाकारणार्‍या जोशी यांनी थेट एका जागतिक वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन मन रितं केलं; पण असं रितं होताना त्यांनी बॉम्बगोळा टाकला आहे.

सहगल यांचं निमंत्रण संमेलनाच्या आयोजकांनी रद्द केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले. अनेक मान्यवर निमंत्रितांनी संमेलनावर बहिष्कार टाकला. या घटनेची जबाबदारी आपण स्वीकारतो, असं सांगून जोशी यांनी राजीनामा दिला खरा; पण या प्रकरणाला राजकीय रंग असल्याची चर्चा सुरू झाली होती.

कुणी तरी आयोजकांना धमकी देऊन त्यांना नको असलेल्या व्यक्तीला नाकारतो. त्यांना निमंत्रण रद्द करण्यास भाग पाडतो. यात कुटिल कारस्थान रचून याचा मागमूसही इतरांना लागू देत नाही. या घटनेचं खापर महामंडळाच्या अध्यक्षांवर फोडलं जातं, ही मराठी भाषिकांसाठी अत्यंत लाजिरवाणी घटना आहे, असंही जोशी यांनी म्हटलं आहे. सहगल यांचं भाषण वादग्रस्त ठरेल, या भीतीपोटी त्यांना पाठवलेलं निमंत्रण रद्द करण्याचं पाऊल संमेलनाच्या आयोजकांनी उचलल्याची चर्चा होती; मात्र, सहगल यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेणार्‍यांच्या कृतीनं संमेलन व्यवस्था विस्कळीत होऊ नये, म्हणून त्यांचं निमंत्रण रद्द केल्याचं आयोजकांचं म्हणणं किती तकलादू होतं, हे त्यातून स्पष्ट झालं. येरावार यांनी त्यावर भाष्य करण्याचं आता टाळलं असलं, तरी भाजपचा दुतोंडीपणा आणि निमंत्रणवापसीचं कारस्थान उघडं पडलं आहे.