Breaking News

लोकसभेसाठी सप-बसप एकत्र; काँग्रेसला डावलले;मोदी-शाह यांची झोप उडविण्याचा दावा


लखनऊः भाजपविरोधात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आले असून लखनौत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपच्या अध्यक्ष मायावती यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची झोप उडवणारी ही पत्रकार परिषद ठरेल, असे सांगत मायावती यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. या आघाडीत सप-बसपने काँग्रेसला स्थान दिलेले नाही; मात्र रायबरेली आणि अमेठी या काँग्रेसच्या पारंपारिक मतदारसंघात उमेदवार उभे करणार नाही, असे मायावतींनी जाहीर केले. 

या पत्रकार परिषदेत मायावती आणि अखिलेश यांनी काँग्रेस व भाजपवर निशाणा साधला. काँग्रेसच्या काळात देशात घोषित आणीबाणी होती, तर आता देशात अघोषित आणीबाणी आहे, अशी टीका त्यांनी केली. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसकडे अनेक वर्षे सत्ता होती,काँग्रेसच्या काळातही भ्रष्टाचार झाला, गरिबी वाढली, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस- भाजपची अवस्था एकसारखीच आहे. दोन्ही सरकारच्या काळात घोटाळे झाले आहेत. काँग्रेसच्या काळात त्यांना बोफोर्स घोटाळ्यामुळे सत्ता गमवावी लागली होती, तर आता भाजपला राफेल घोटाळ्यामुळे सत्ता गमवावी लागेल, असा दावा मायावतींनी केला. यापुढे काँग्रेससोबत आघाडी करणार नाही, आम्ही काँग्रेससोबत गेल्याने नेहमी त्यांचा फायदा झाला; पण आम्हाला यातून काहीच मिळाले नाही, असे त्यांनी सांगितले.
यादव यांनी मायावती यांना पाठिंबा देताना सांगितले, की ज्या दिवशी भाजप नेत्याने मायावतींवर आक्षेपार्ह टीका केली होती, त्याच दिवशी महाआघाडीची पायाभरणी झाली होती. मायावतींचा अपमान हा माझा अपमान असल्याचे यादव यांनी सांगितले. पंतप्रधानपदासाठी मायावतींना पाठिंबा देणार का, या प्रश्‍नाचेही अखिलेश यांनी उत्तर दिले. आम्ही कोणाला पाठिंबा देणार हे सर्वांनाच माहीत आहे, असे सूचक उत्तर त्यांनी दिले. 


बसप, सपला प्रत्येकी 38 जागा

समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आले, तरी लोकसभेसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मायावती यांनी जागावाटपाचा फॉर्म्युलाही सांगितला. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण 80 जागा असून बसप आणि सप प्रत्येकी 38 जागांवर निवडणूक लढवणार आहे. रायबरेली आणि अमेठी या दोन मतदारसंघात काँग्रेसविरोधात उमेदवार देणार नाही, असेही मायावतींनी सांगितले. उर्वरित जागा महाआघाडीत सामील होणार्‍या अन्य पक्षांसाठी सोडल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले. अन्य छोट्या पक्षांशी चर्चा सुरू असल्याचे सांगत महाआघाडीत आणखी कोणते पक्ष येणार याचे उत्तर देणे त्यांनी टाळले.


ही तर संधीसाधूंची आघाडीः गडकरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यासाठी सप व बसप एकत्र येत आहेत. ही संधीसाधू आघाडी आहे. मोदी विरोधातील द्वेषाला आधार बनवून हे एकत्र येत आहेत, अशा शब्दात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. निष्क्रियता आणि भ्रष्टाचार ही आधीच्या सरकारची वैशिष्टये होती; पण आम्ही सत्तेवर आल्यानंतर जाहीरनाम्यात दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे मागच्या साडेचार वर्षात सुशासन, व्यवसाय सुलभता आणि विकासाभिमुख कारभार केला असा दावा गडकरी यांनी केला.


महाराष्ट्रात आघाडीतील जागावाटपाचा तिढा कायम

काँग्रेस-राष्ट्रवादीतील आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. नंदुरबार, नगर, औरंगाबाद या तीन जागांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष सुरू आहे. नंदुरबारच्या जागेसाठी राष्ट्रवादी इच्छूक आहे, तर नगरची राष्ट्रवादीच्या कोट्यातील जागा काँग्रेसला हवी आहे. येत्या 15 जानेवारीला दिल्ली दोन्ही पक्षाच्या नेत्यांची पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासाठी काँग्रेसने नगरची जागा मागितली आहे; मात्र ही जागा काँग्रेसला सोडायला राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे.